सर्वाधिक महाग गॅस संपुआ काळातच

नसलेल्या अधिकारात इतरांना ज्ञानाचे डोस पाजणाऱ्यांची टिंगल करण्यासाठी आपण “नाकानं कांदे सोलणं” अशी म्हण वापरतो. “तोंडपाटीलकी करणं” असेही म्हणतो.‌ ही म्हण थोडी विषयानुरूप केली तर, गॅस सिलेंडरच्या संदर्भात तिचं स्वरूप बदलता येईल- “तोंडानं ‘गॅस’ सोडणं” अशी ती करता येऊ शकते. परवाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मुहूर्तावर मोदी सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरचे भाव शंभर रुपयांनी कमी केले, तेव्हा विरोधकांनी अशीच कृती केली. त्यातही आघाडीवर होत्या, आपल्या सुप्रिया लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी (शरच्चंद्र पवार गट) च्या पहिल्या घोषित उमेदवार. पक्षाध्यक्ष आणि पिता शरद पवार यांनी भोर येथील मेळाव्यात ही घोषणा, यादीबिदीच्या भानगडीत न पडताच करून टाकली ! (तरीही याला घराणेशाही म्हणता येणार नाही बरं का)

तर, सुप्रिया गॅस दरकपातीबद्दल म्हणाल्या- “हा निवडणुकीचा जुमला आहे. या दरकपातीचं टायमिंग निवडणुकीच्या तोंडावरच कसं आलं ? मोदींना महिलांची एवढीच काळजी आहे तर गेली दहा वर्षे गॅसचे भाव कमी का केले नाही ? आमच्या राजवटीत गॅस सिलेंडर स्वस्त होतं” वगैरे वगैरे. गेली 15 वर्षे खासदार आणि चार वेळा “संसद रत्न” पुरस्कार मिळालेल्या नेत्याच्या विद्वत्तेबद्दल आपण शंका घेऊ नये. परंतु, विरोधासाठी विरोध म्हणून काहीही बोलायचं, असंही नसतं ना राजेहो.

गेल्या वर्षीच्या रक्षाबंधनाला, सहा महिन्यांपूर्वीच, याच मोदी सरकारनं शंभर नव्हे, दोनशे रुपये कपातीची ओवाळणी भगिनींना दिली होती, हे विसरल्या का ताई तुम्ही ? ते दोनशे रुपये तुम्ही विरोधी पक्षांनी दिले होते, असा गोड (गैर)समज तर तुम्ही करून घेतला नाही ना.मोदींच्या राजवटीतील सर्वाधिक 1160 रुपये (नागपूर) गॅसदर तेव्हा होता. (कित्ती ही महागाई !) पण, थांबा. जरा धीर धरा अन् ऐका तुमच्या संपुआ सरकारची ‘कामगिरी’

महान अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना सर्वात महाग दरानं गॅस सिलेंडर ग्राहकांना देण्यात आला होता, हे माहीत आहे का तुम्हाला ? देशाच्या इतिहासात सर्वाधिक महागड्या दराचा गॅस विकण्याचा ‘शुभारंभ’ होण्याचा तो दिवस होता 5 जानेवारी 2014. दर होता 1273 रुपये मुंबई, 1270 कोलकाता, 1241 दिल्ली, 1234 चेन्नई. हा दर 1 फेब्रुवारीपर्यंत राहिला आणि सरकारनं उदार होऊन शंभर रुपयांची कपात केली होती. या काळात सरकार तुमचंच होतं, हे सोयीस्करपणे विसरलात ना. असंच होतं बघा. दहा-बारा वर्षांपूर्वीचं नीट आठवतच नाही पन्नाशीनंतर,म्हणूनच सुप्रियाताई सांगत (तोंडाचा ‘गॅस’ सोडत) आहेत- “आमच्या काळात गॅस सिलेंडर 400 रुपयांना मिळायचं.” हे म्हणजे, कधीचे तरी जुने भाव सांगायचे अन् स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. दुसरं काय ?

संपुआला 10 वर्षानंतर सत्ता सोडावी लागली, त्या सुमाराचे गॅस सिलेंडरचे प्रत्यक्ष दर बघा- (मुंबई) 11 डिसेंबर 2013- 1038 रु., 1 जानेवारी 2014- 1264 रु., 1 फेब्रुवारी- 1167 रु., 1 मार्च- 1115 रु., 1 एप्रिल- 1014 रु., 1 मे- 957 रु. हे दर ज्यादा सबसिडी देऊन मोदी सरकारला कमी करावे लागले, तेव्हा कुठे तो सर्वात कमी 468 रुपयांपर्यंत (1 सप्टेम्बर 2016) खाली आला होता. नाहीतर हाच गॅस आज दोन हजारांच्या घरात राहिला असता आणि हेच सर्व लोक मोदींच्या नावानं बोंबा मारायला मोकळे राहिले असते. किती खोटं बोलायचं राजकारणापायी.अशा खोटारड्या खासदाराला पुन्हा निवडून द्यायचं का, याचा विचार बारामतीकरांनी दहादा केला पाहिजे बघा.

– विनोद देशमुख

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Fri Mar 15 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डव्हेल स्टे रिलॅक्स अँड रेज्युवेनेट कॉकटेल केनन फॉर्म होउस मध्ये तरुणीला जेवन करण्याच्या बहाण्याने घेवुन जाऊन तिचे व स्वतःचे आधार कार्ड देऊन रूम बुक केले व तिच्या संमतीशिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार करून जबरी संभोग केला व कामठी बस स्टँड वर सोडुन निघून गेला.ही घटना आज दुपारी साडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com