– आठ तास चालली शस्त्रक्रिया
– वरुणम् सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची यशस्वी कामगीरी
नागपूर :- यवतमाळजवळ एका 49 वर्षीय पुरुषाचा भीषण रस्ता अपघात झाला. त्याला छाती, डोके, उजव्या मांडीचे व पायाच्या हाडांचा अक्षरश: चुराडा झाला होता. शरीरावर अनेक जीवघेण्या जखमाही होत्या. अनेक फॅक्चर व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाले होते. अती रक्तस्त्रावामुळे रुग्णाचा उजवा पाय कापण्याचा सल्ला काही डॉक्टरांनी दिला होता. मात्र हाडांचा चुराडा झालेल्या पायावर जटील शस्त्रक्रिया करुन रुग्णाचा पाय वाचविण्यात वरुणम् सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. राजू चौबे असे त्या रुग्णाचे नाव आहे.
यवतमाळनजीक 26 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास राजू चौबे यांचा अपघात झाला. रुग्णावर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर तात्काळ सायंकाळी 7 वाजता वरुणम् सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, रामदासपेठ, नागपूर येथे हलविण्यात आले.
डॉ. उत्सव अग्रवाल (ऑर्थोपॅडीक सर्जन), डॉ. प्रशांत वानखेडे (फिजिशियन), डॉ. स्नेहजीत वाघ (प्लास्टिक आणि व्हॅस्कुलर सर्जन) या डॉक्टरांच्या चमूने आपत्कालीन अवयव आणि जीव वाचविणाऱ्या शस्त्रयेसाठी नातेवाईकांचे समुपदेशन केले. रात्री 11 वाजता तत्काळ रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही जटील अशी शस्त्रक्रिया 8 तास चालली. रुग्णावर पायाला अनेक फॅक्चर होते. रक्तवहिन्याही तुटल्या होत्या यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे राजूचा जीव तर वाचलाच पण उजवा पायही वाचविण्यात डॉक्टरांच्या चमूला यश आले. वरुणम् सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील तज्ञांच्या तात्काळ उपचारामुळे राजू चौबे यांना नवीन जीवन मिळाले. त्याच्या पायाची पुनर्बांधणी आणि संसर्ग नियंत्रणासाठी त्याच्यावर इतर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याचे डॉ. उत्सव अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
डॉ. उत्सव अग्रवाल यांनी माहिती देतांना सांगितले कि, अशा भीषण अपघातांमध्ये ‘वेळ महत्त्वाचा आहे’. अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास चांगले परिणाम दिसून येतात. रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होते तसेच रुग्णही लवकर रीकव्हर होतो.