– एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप
नागपूर :- देशातील सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करण्याची, विशेषत्वाने आदिवासी, मागास लोकांच्या जीवनात परिवर्तन होऊन ते चांगले जीवन कसे जगतील, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था त्याच प्रयत्नांवर २७ वर्षे कार्य करीत आहे. शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणे आणि त्यांच्या जीवनाचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ (सुखांक) वाढविण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले.
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी इंडिया टिव्हीचे एडिटर-इन-चीफ तसेच चेअरमन रजत शर्मा, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पिठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष अरुण लखानी, उपाध्यक्ष केशव मानकर, सचिव राजीव हडप, सहसचिव विरेंद्र अंजनकर, कोषाध्यक्ष अतुल मोहरीर, अतुल शिरोडकर, धनंजय बापट, डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. राजीव पोतदार, रुपेश ढेपे, वसंत चुटे, अनील जोशी, प्रशांत बोपर्डीकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘कै. लक्ष्मणराव मानकर संस्थेने २७ वर्षे पूर्ण केली आहेत. एखादी संस्था २७ वर्षे सातत्याने काम करते हे फार दुर्मिळ आहे. कै. मानकर गुरुजी आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. संसदीय कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संघटनेसाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. विदर्भातील मागास भागातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते. मानकर ट्रस्टच्या स्मृती त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जुळलेली आहे.’ यावेळी ना. गडकरी यांनी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतील पदाधिकारी व सदस्यांचा परिचय करून दिला.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेल्या संस्कारातून संस्थेतील सर्व लोक समाजासाठी निःस्वार्थ कार्य करीत आहेत. ‘वही मनुष्य है की जो मनुष्य के लिए मरे’ या ओळींचा परिचय देणारे कार्य सुरू आहे,’ असेही ते म्हणाले. जितेंद्रनाथ महाराज यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचा गौरव केला. एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक-पर्यवेक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तर अनुपमा देशपांडे, रविंद्र फडणवीस, चंदू पेंडके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दिवाळीमध्ये १२०० पुरुष शिक्षक आणि पर्यवेक्षकांना शर्ट-पँट तसेच महिलांना साडी पाठविणार असल्याची घोषणा ना. श्री. गडकरी यांनी केली. २४ ते २७ अॉगस्ट या कालावधीत झालेल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये आदिवासी क्षेत्रातील १ हजार १६ एकल विद्यालयांचे शिक्षक व पर्यवेक्षक सहभागी झाले होते.
लाखो आदिवासींना रोजगाराचे स्वप्न
आदिवासींपर्यंत संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना पोहोचविल्या. जन-धन योजना, अटल पेंशन योजना, उज्ज्वला गॅस योजना, जीवन ज्योती विमा योजना आदींचा लाभ मिळाला. पण याने काम होणार नाही. याच्याही पुढे जायचे आहे. रोजगाराच्या दिशेने पाऊल टाकायचे आहे. आदिवासी भागातील लाखो लोकांना रोजगार प्राप्त करून द्यायचा आहे, असा निर्धार ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
झिंग्यांच्या शेतीतून रोजगार
झिंग्यांचे भाव सिंगापूरमध्ये ८ हजार रुपये किलो आहे. आपल्याकडे २०० रुपये प्रतीकिलो आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये ६ हजार मालगुजारी तलाव आहेत. याठिकाणी आपण झिंग्यांची शेती करू शकता. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आम्ही शिकवू, तुम्ही फक्त रोजगार निर्माण करा, असे आवाहन ना. गडकरी यांनी आदिवासी युवकांना केले.
एकल विद्यालयाचे काम प्रेरणादायी : रजत शर्मा
मला याठिकाणी एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पण खरे तर माझ्याकडून तुम्हाला काही प्रेरणा मिळावी, यापेक्षा तुमच्याकडून मला प्रेरणा मिळत आहे, या शब्दांत रजत शर्मा यांनी गौरव केला. गरिबांना, उपेक्षितांना शिक्षण देणे, यापेक्षा मोठे काम नाही, असेही ते म्हणाले. ना. गडकरी यांच्याबद्दल ते म्हणाले, ‘कल्पकतेच्या क्षेत्रात नितीनजींचे योगदान अमर्याद आहे. कल्पना असतील, कल्पक प्रयोग असू शकतात, पण त्यांची अंमलबजावणी नितीनजीच करू शकतात. कमालीचा आत्मविश्वास आणि समर्पण त्यांच्यामध्ये बघायला मिळतं. मी नितीनजींना चार दशकांपासून ओळखतो. तरीही प्रत्येकवेळी त्यांची नवी ओळख होते. त्यांच्यासारख्या लोकांमुळे समाजाला दिशा मिळण्याचे काम होते.’
…आणि मी टिव्हीवर आलो
रजत शर्मा यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितले. ते म्हणाले, ‘माझे आयुष्य सुरुवातीला साधारणच होते. दिल्लीमध्ये भाजी बाजारात एक दहा बाय दहाची खोली होती. बालपण तिथेच गेले. घरी वीज नव्हती. शेजारी असलेल्या रेल्वे स्टेशनवर अभ्यास करायचो. त्याकाळात टिव्हीवर शनिवारी अर्धा आणि रविवारी अर्धा सिनेमा दाखवायचे. मी दुसऱ्याच्या घरी जाऊन बघायचो. एकदा चित्रपट बघायला मिळाला नाही म्हणून अस्वस्थ होतो. तर वडील म्हणाले, ‘दुसऱ्याला बघायला टिव्हीवर जातो, पण दम असेल तर स्वतः टिव्हीवर ये, लोक तुला बघतील.’ मला आनंद आहे की माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो.’