मनपा आयुक्तांनी घेतला कार्यवाहीचा आढावा : मनपा कार्यालये, चौक, रस्ते, प्रमुख स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई
नागपूर. ३ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नागपूर शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहिम उत्साहात राबविण्यात येणार आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेची तयारी अंतिम टप्प्यात येत आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा यासाठी मनपाद्वारे नागरिकांना अत्यंत कमी दरात तिरंगा उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय संपूर्ण शहरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर व्हावा, देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, मनपा मुख्यालयातील इमारती, नगर भवन, झोन कार्यालय यासह शहरातील शहिद स्मारक, महत्वाचे चौक, कविवर्य सुरेश भट सभागृह, रा.पै. समर्थ चिटणीस पार्क स्टेडियम आणि यशवंत स्टेडियमसह दोन विशेष मार्गांवर तिरंगी रोषणाई केली जाणार आहे. तसेच महत्वाच्या चौकातसुध्दा तिरंगी रोषणाई केली जाणार आहे. एकूणच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या तिरंगी रोषणाईत संपूर्ण नागपूर शहर उजळून निघणार आहे. यासंबंधीच्या संपूर्ण तयारीचा मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.३) आढावा घेतला.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, मिलींद मेश्राम, विजय हुमने, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता अजय मानकर, सहायक आयुक्त गणेश राठोड, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्तांनी ‘हर घर तिरंगा’च्या अनुषंगाने प्रत्येक विभाग आणि झोनकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. मनपाद्वारे नागरिकांना कमीत कमी दरात ध्वज उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले. मनपा मुख्यालयासह दहाही झोन कार्यालयामध्ये अवघ्या १४ आणि २६ रुपयांमध्ये ध्वज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याशिवाय आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना ध्वज देण्यासाठी सेवाभावी संस्था आणि नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मनपातर्फे खरेदी करण्यात आलेले ध्वज मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. याशिवाय झोन स्तरावर प्रत्येक घरावर तिरंगा फडकला जावा यासाठी गरीब नागरिकांना सहकार्यासाठी सेवाभावी संस्था आणि नागरिकांचे त्यांच्या इच्छेनुसार सहकार्य घेण्यात यावे, असेही मनपा आयुक्तांनी सूचित केले.
मनपाच्या विविध विभागातर्फे ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अधिका-यांनी यावेळी दिली. प्राप्त झालेले ध्वज झोन स्तरावर कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवतांना वाटप करण्याबाबतही आयुक्तांना सूचना दिली.
नागपूर शहरात अनेक ठिकाणी शहिदांचे स्मारक, पुतळे आहेत. शहरातील अनेक चौकांना स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आहे. शहरातील ७५ महत्वाचे व ऐतिहासिक चौकांमध्ये आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात यावी. यासाठी चौक, स्मारकांची स्वच्छता, रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता करणे आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचीही सूचना आयुक्तांनी केली. याशिवाय ढोल ताशा पथकाचाही सहभाग घेण्याची त्यांनी सूचना केली.
दोन मार्गांवर तिरंगी विद्युत खांब
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील दोन महत्वाच्या मार्गांवरील विद्युत खांबांवर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सिव्हिल लाईन्स येथील संविधान चौक ते लेडीज क्लब चौक आणि शंकर नगर ते जापानी उद्यान चौक या दोन मार्गावरील विद्युत खांब तिरंगी रोषणाईने उजळून निघणार आहे. याशिवाय शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृह, रा. पै. समर्थ चिटणीस पार्क स्टेडियम आणि यशवंत स्टेडियमवर ढोल ताशा पथकाचे सादरीकरण आणि विद्युत रोषणाई केली जाईल.
प्रोफाईलवर तिरंगा ठेवा
सोशल मीडियाचे सर्व हँडल व्हाट्सॲप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामसह अन्य ठिकाणी भारतीय तिरंग्याची फोटो ठेवण्याबाबत राज्य शासनाकडून दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहेत. त्यानुसार मनपातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागपूर शहरातील सर्व नागरिकांनी स्वत:च्या सोशल मीडियावर तिरंग्याचे प्रोफाईल फोटो लावण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.