स्वनिधी महोत्सवात पथनाट्याद्वारे केली जनजागृती
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषांगाने मनपाच्या समाज विकास विभागाद्वारे नागपूर शहरात घेण्यात आलेल्या स्वनिधी महोत्सवांतर्गत शहरातील विविध भागामध्ये पथनाट्याद्वारे पथविक्रेत्यांच्या विविध योजनांची माहिती पोहोचविणे आणि जनजागृतीचे कार्य करणाऱ्या तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या चमूचा मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सत्कार केला. बुधवारी (ता. ३) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षामध्ये आयुक्तांनी पथनाट्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देउन सन्मानित केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, समाज विकास विभागाचे उपायुक्त विजय हुमने, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्वाती धर्माधिकारी, प्राध्यापक डॉ. मसराम उपस्थित होते.
मनपा आयुक्तांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी अबोली कुशवाह, प्रणव जोल्हे, प्रणव जुमडे, प्राची शिरसाट, रूनिचा पवार, हर्ष संतापे, हर्षा जोगे, सिद्धी पुरी, वैदेही क्षीरसागर, श्रृशित सिरसाट यांना प्रमाणपत्र देउन व संपूर्ण चमूला सन्मानचिन्ह प्रदान केले.
तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या चमूद्वारे सदर फ्रूट बाजार, सदर गांधी चौक, फुटाळा, आयटी पार्क, गोकुलपेठ बाजार, व्हेरॉयटी चौक, बर्डी बाजार, जयताळा बाजार, बेलतरोडी बाजार, कॉटन मार्केट, महाल बाजार, नंगा पुतळा चौक, बुधवार बाजार, मेडिकल चौक, सक्करदरा बाजार, गणेशपेठ बस स्टँड चौक, गोधनी, इंदोरा मैदान, कमाला चौक, जिंजर मॉल जरीपटका, कमाल चौक भाजी बाजार, दही बाजार इतवारी, मानकापूर, सुगत नगर या विविध बाजार भागात आणि पथविक्रेत्यांच्या व्यवसाय स्थळी जाउन पथनाट्य सादर करण्यात आले. पथविक्रेत्यांना स्वनिधी महोत्सवाची माहिती देणे आणि त्यांच्यासाठी केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या स्वनिधी योजनेबाबत माहिती देउन जनजागृती करण्याचे कार्य या चमूद्वारे करण्यात आले. चमूद्वारे स्वनिधी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमातही सुरेश भट सभागृहामध्ये पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.