– अमेरिकेतील गर्जे मराठी ग्लोबल एक्सलन्स समीटचे (शिखर परिषद) उद्घाटन
नागपूर :- जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणसाने ज्ञानाच्या भरवशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग त्यांनी भारताच्या कृषी क्षेत्राच्या तसेच येथील कष्टकरी शेतकऱ्याच्या विकासासाठी करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) देशाबाहेरील मराठी बांधवांना केले.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात आयोजित गर्जे मराठी ग्लोबल एक्सलन्स समीटचे (शिखर परिषद) ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला सीओईपी इनक्युबेशन सेंटरचे संस्थापक नरेंद्र काळे, सिडनी (अॉस्ट्रेलिया) येथील रस्ते विशेषज्ञ डॉ. विजय जोशी, गर्जे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष आनंद गानू आणि संयोजक संदीप पाध्ये यांची उपस्थिती होती. या शिखर परिषदेकरिता जगभरातील मराठी बांधव अमेरिकेत एकत्र आले आहेत. त्यांच्यासोबत ना. गडकरी यांनी संवाद साधला व देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करायचे आहे, असा निर्धार केला आहे. पण त्यासाठी ज्या मराठी बांधवांनी देशाच्या बाहेर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांच्या कामाचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचा भारताला फायदा होणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी गरज पडल्यास जॉईंट व्हेंचरमध्ये भारतासोबत काम करा. येथील तरुणांना सोबत घेऊन नव्या उद्योगांची स्थापना करा. विशेषतः कृषी, ग्रामीण, जंगल आणि आदिवासी यांच्या विकासासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, भारतातील खेडी समृद्ध करण्यासाठी आपण योगदान देणे गरजेचे आहे.’ कृषी क्षेत्रातील निर्यात वाढविण्यासाठी कोणते नवे तंत्रज्ञान आपण विकसित करू शकतो, त्यामाध्यमातून शेतकरी कसा समृद्ध होऊ शकतो आणि देशाचा कृषी दर वाढू शकतो, याचा आपण विचार करावा, असेही आवाहन ना. गडकरी यांनी केले. महाराष्ट्र ही संतांची, स्वातंत्र्यसैनिकांची, समाजसुधारकांची भूमी आहे. या भूमीतील मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावत आहे याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
उद्योजकांचा अभिमान
महाराष्ट्रातील उद्योजकांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून कर्तृत्व सिद्ध केले. सॉफ्टवेअर, बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांनी जगात नाव कमावले, याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गारही ना. गडकरी यांनी काढले. शिखर परिषदेच्या माध्यमातून देशाबाहेरील मराठी बांधव आपले मराठीपण जपत आहे, याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.