– महानगर भाजपतर्फे व्यापारी संवाद संमेलन
नागपूर :- शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि शहराच्या विकासात त्यांचे योगदानही घ्यायचे आहे. नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईल. पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माते व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
नागपूर महानगर भाजपच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी व्यापारी बंधूंशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, आ. विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, पराग सराफ, आसीन खान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते विविध बँकांच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. ‘नागपूरच्या औद्योगिक विकासात कोणत्या अडचणी येत आहेत, ते व्यापारी बंधूंनी सांगावे. सरकारच्या वतीने शक्य तेवढी मदत केली जाईल आणि त्या अडचणी सोडविण्यात येतील. उद्योगांच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे, पण त्यासाठी तुमच्याकडून सूचना येणे गरजेचे आहे. तुम्ही शहरातील अर्थव्यवस्था वाढीस लावली तर रोजगारही वाढणार आहे,’ असे ना. गडकरी म्हणाले.
व्यापारी वर्गाचे कौतुक
आपल्या फायद्याचा विचार न करता लोकांची सेवा करणे, हीच आपली विचारधारा आहे. कोरोनाच्या काळात नागपूरकरांच्या मदतीला अनेक व्यापारी बंधू धावून आले. त्यांनी केलेली मदत कुणालाही विसरता येणार नाही, या शब्दांत ना. गडकरी यांनी व्यापारी वर्गाचे कौतुकही केले. नागपूरच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
तुम्ही मालक, आम्ही नोकर
नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्यांचा थाट कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि जनतेच्या प्रेमातून आलेला असतो. त्यामुळे जनतेच्या सुखी व समाधानी जीवनासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे. इथे व्यासपीठावर बसलेले लोकप्रतिनिधी जनतेचे नोकर आहेत आणि सभागृहात बसलेली जनता मालक आहे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.