नागपूर :-साखर झोपेत असलेल्या प्रवाशाचा पर्स चोरणार्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी (गुन्हे शाखा) पकडले. पुरकाम नासीर (34) रा. मोमीनपुरा आणि त्याचा साथीदार अविनाश उर्फ साहिल समुंद्रे (22) रा. नारी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह पर्स जप्त करण्यात आला.
सावनेर येथील रहिवासी फिर्यादी अनिकेत गजभिये (28) हा नागपुरातील हॉटेलमध्ये काम करतो. कामावरून घरी जाण्यासाठी तो निघाला. मात्र, गाडी मिळाली नाही, त्यामुळे तो स्टेशनवरच झोपला. साखर झोपेत असल्याची संधी पाहून पुरकाम आणि त्याचा साथीदार अविनाश यादोघांनी त्याच्या पॅन्टच्या खिशातून पर्स चोरला. पर्स मध्ये 3 हजार 600 रूपये होते.
अनिकेतला जागा आली तेव्हा खिशात पर्स नव्हता. त्याने लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अविनाश आणि पुरकाम चोरी करताना दिसून आले. आरोपीच्या शोधासाठी पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आला पथकात उपनिरीक्षक प्रविण भिमटे, सुरेश राचलवार, चंद्रशेखर मदनकर, राहुल यावले, पंकज बांते यांचा समावेश होता. पथकाने स्टेशनवर आरोपीचा शोध घेतला असता दोघेही ईटारसी एन्डकडे संशयास्पदरित्या आढळले. दोघांनाही ताब्यात घेवून चौकशी केली असता पर्स चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह पर्स जप्त केला. यापुर्वी त्या दोघांनी मोबाईल चोरी केल्याचे सांगितले.