-‘ इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक महोत्सवात पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव
नागपूर :- कोणत्याही स्पर्धेमध्ये मिळालेला पुरस्कार विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ठेवा असून संपूर्ण जीवनावर प्रभाव टाकत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी केले. महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ ७ ते ११ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पार पडला. इंद्रधनुष्य महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूने तब्बल ८ पुरस्कार पटकाविले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव सोमवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. बोकारे मार्गदर्शन करीत होते.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ, आयआयएल प्रभारी संचालक डॉ. निशिकांत राऊत, इंक्युबेशन संचालक डॉ. अभय देशमुख यांची उपस्थिती होती. मागील वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात जास्त पुरस्कार मिळाल्याने चमूचे अभिनंदन करीत पुढील वर्षी दुप्पट पुरस्कार कसे मिळवता येतील याचे नियोजन करण्याचे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. बोकारे यांनी पुढे बोलताना केले. अन्य विद्यापीठ प्रत्येक कला प्रकारात अधिकाधिक विद्यार्थी कसे सहभागी होतील, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. त्यामुळे त्यांना अधिक पुरस्कार मिळत असल्याकडे लक्ष वेधत आगामी काळात त्यांच्यापेक्षा चांगले नियोजन करण्याच्या सूचना कुलगुरूंनी यावेळी दिल्या. युवा महोत्सवात विद्यापीठ चमूची वेगळी छाप पडावी म्हणून अत्याधुनिक साहित्य तसेच त्यांच्या साथीदारांसह स्पर्धेत उतरले पाहिजे. याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सांस्कृतिक चमूसह विद्यार्थी विकास विभागाला दिल्या. पुढील स्पर्धेत विद्यापीठाला अजिंक्यपद ट्रॉफी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करीत विद्यापीठाला बहुमान मिळवून दिल्याने विद्यार्थ्यांचे आभार मानले. इंद्रधनुष्य महोत्सवात राज्यपाल नामित निरीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करीत विद्यापीठ चमूला पाठबळ प्राप्त करून दिल्याने कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांचे देखील कुलगुरूंनी अभिनंदन केले.
प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे यांनी पुरस्कार प्राप्त कलावंतांचे अभिनंदन करीत प्रतिनिधित्व तसेच नियोजन करण्यात कमी पडत असल्याचे सांगितले. आगामी युवा महोत्सवात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देत उत्कृष्ट कलेचे सादरीकरण करीत अधिकाधिक पुरस्कार प्राप्त करण्यासाठी चांगली तयारी करण्याचे आवाहन केले. यावेळी राज्यपाल नामित महोत्सवाचे निरीक्षक तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मनोगत व्यक्त करताना तेथील अनुभव विशद केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करीत त्यांच्या अभिनंदनचा सोहळा आयोजित करण्याबाबत कुलगुरूंनी सुचित केल्याचे सांगितले. विविध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण होत निकाल कशाप्रकारे येत होते, तसेच तेथील प्रत्येक आयोजन आणि नियोजनाबाबत माहिती डॉ. हिवसे यांनी यावेळी दिली. युवा महोत्सवातील पुरस्कारांमध्ये वाढ व्हावी म्हणून ललित कला विभागाची मदत घेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना येथे एक महिना प्रशिक्षण देण्याबाबत त्यांनी माहिती दिली. एक विद्यार्थी विविध कला प्रकारात कशाप्रकारे सहभागी होईल याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी विद्यार्थी विकास विभागाला दिल्या. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी केले तर आभार सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी मानले.
पुरस्कार प्राप्त चमू
अकोला येथील इंद्रधनुष्य युवा महोत्सवात विद्यापीठ संघाने साहित्यिक प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. अनुष्का नाग, निर्मित लंगडे व प्रथमेश लांजेवार यांचा समावेश असलेल्या संघाने प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकावला. मेहंदी खातून शेख व विशाल राजकुमार खर्चवाल यांचा समावेश असलेल्या संघाने वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. मेहंदी खातून शेख विद्यार्थिनीने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात कल्याणी चिकुलवार या विद्यार्थिनीने प्रथम पुरस्कार पटकाविला. भारतीय समूह गान स्पर्धेत संघाने द्वितीय पुरस्कार पटकावला. या संघामध्ये इंद्राणी इंदुरकर, राधा ठेंगडी, तेजस्विनी खोडतकर, आयुषी देशमुख, निधी इंगोले, निधी रानडे, सुयोग देवळकर, चेतन नागोसे यांचा समावेश होता. स्किट (प्रहसन) प्रकारात संघाने तृतीय क्रमांक पटकावला. यात मोहित सरकार, शिफा अन्सारी, इंद्राणी इंदुरकर, चिराग शुक्ला, तान्या पंडित, शशांक रहांगडाले, युगलहंस मकराम यांचा समावेश होता. स्थळचित्रण प्रकारात प्रणय नैताम याने तृतीय क्रमांक, स्थळ चित्र प्रकारात यश वानखेडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. थिएटर प्रकारात लेखक म्हणून जय गाला तर दिग्दर्शक म्हणून सारंग गुप्ता यांनी जबाबदारी पार पाडली. साहित्यिक प्रकारात प्रशिक्षकाची जबाबदारी ॲड. दिपाली टेकाम यांनी तर संघ व्यवस्थापक म्हणून सारंग गुप्ता व डॉ. मंजू दुबे आणि सांस्कृतिक समन्वयक म्हणून प्रकाश शुक्ला यांनी चोख भूमिका बजावली.