यवतमाळ :- भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी अधिनियमातील तरतुदीन्वये एक्झिट पोल घेण्यावर बंदी घातली आहे. त्याअन्वये एक्झिट पोल घेण्यासह असा पोल कोणत्याही माध्यमाद्वारे प्रसारीत करण्यावर देखील मनाई राहणार आहे.
लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 126 क चे पोट-कलम (1) अंतर्गत अधिकारांचा वापर करत निवडणूक आयोगाने या कलमाच्या उप-कलम (2) च्या तरतुदी नुसार शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजतापासून शनिवार दि.1 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता दरम्यानच्या कालावधीसाठी सदर बंदी घालण्यात आली आहे.
या बंदी आदेशानुसार प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रसाराद्वारे एक्झिट पोल आयोजित करणे आणि प्रकाशित करणे किंवा प्रसिद्ध करणे, इतर कोणत्याही प्रकारे निवडणुकीशी संबंधित कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल घेण्यास मनाई असेल, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी कळविले आहे.