संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील तीन महिन्यापासून कामठी तालुक्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे अनुदान थकले आहे त्यामुळे शिवभोजन केंद्र चालवावे कसे?असा प्रश्न शिवभोजन केंद्र चालकाकडून उपस्थित केला जात आहे.
शिवभोजन केंद्राचे अनुदान थकल्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला,किराणा,खाद्य तेलासह अन्य साहित्य विकत कसे घ्यायचे?अनेक किराणा दुकानदारांचे मागील तीन महिण्यासपासून बिल थकले आहे त्यामुळे किराणा दुकानदारही शिवभोजन केंद्र चालकांना उधारी देत नाही शिवाय काही किराणा दुकानदार बिल थकल्यामुळे शिवभोजन केंद्र चालकांना शिवभोजन केंद्रात येऊन उधारीचे पैसे मागत आहेत.तर शिवभोजन केंद्रात स्वयंपाक करणाऱ्या मजुरांनाही मजुरीचे पैसे कसे द्यावे?असा प्रश्न शिवभोजन केंद्र चालकांना पडला आहे तर अशा परिस्थितीत नाईलाजास्तव केंद्र चालकांवर केंद्र बंद करण्याची पाळी आली आहे.
मागील काही वर्षांपूर्वी सत्तेवर असलेल्या शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचा आस्वाद आताही गरीब व गरजवंत घेत असून 10 रुपयात एक वेळचे जेवण मिळत असल्यामुळे हजारो लोक शिवभोजन केंद्रात शिवथाळीचा लाभ घेत आहेत. तेव्हा शिवभोजन केंद्राचे अडकलेले अनुदान लवकरात लवकर शिवभोजन केंद्र चालकांना देण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.