नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये डीएसए, नागपूर महानगरपालिका आणि एचक्यूएमसी संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत दमदार विजय मिळविला.
डब्ल्यूसीएल मैदानावर शुक्रवारी (ता.19) सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात डीएसए संघाने आयटी स्ट्रायकर संघाचा तब्बल 49 धावांनी पराभव करीत दमदार विजय मिळविला. आयटी स्ट्रायकर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीस आलेल्या डीएसए संघाच्या अमित पी. ने 54 धावांची नाबाद खेळी करीत संघाकरिता मोठा धावडोंगर उभा केला. डीएसए संघाने 9.7 षटकांत 6 बाद 115 धावफलक उंचावले. संघासाठी सचिन के. ने 31 धावांची खेळी केली. प्रतिस्पर्धी आयटी स्ट्रायकर संघाच्या अक्षय वर्माने 2 तर ऋषिकेश आणि जिगरने प्रत्येक 1 गडी बाद केला. 115 धावांचे निर्धारित लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयटी स्ट्रायकर संघाला डीएसए संघाच्या गोलंदाजांच्या भेदक मा-यापुढे फारशी कामगिरी करता आली नाही. निर्धारित 10 षटकांत संघ 9 बाद 66 धावाच करू शकला. डीएसए च्या दिपक वजलवारने 3 तर अमित आणि सचिनने प्रत्येकी 2, महेश बावणे आणि विकेश यादवने प्रत्येकी 1 गडी बाद करीत संघाच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
दिवसाच्या दुस-या सामन्यात एमएसईबी संघाने मनपा संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 10 षटकांत 8 बाद 95 धावा काढल्या. संघाकडून पराग मुप्पडिवारने सर्वाधिक 21 धावा तर दिलिप फुंडेने 19 आणि सागर इंगळे व शिरीष ढोबळेने प्रत्येकी 12 धावांचे योगदान दिले. प्रतिस्पर्धी मनपा संघाच्या नीरज (17 धावा) आणि अमित (5 धावा)ने प्रत्येक 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात मनपा संघाने 9.4 षटकांत 6 बाद 98 अशी धावसंख्या करीत विजय मिळविला. संघाचे जितेंद्र गायकवाड यांनी 43 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. एमएसईबी संघाच्या पराग मुप्पडीवारने 2 गडी बाद केले.
एचक्यूएमसी विरुद्ध दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्यातील सामन्यात एचक्यूएमसी संघाने 62 धावांनी मोठा विजय मिळविला. एचक्यूएमसी संघाने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित षटकांत 3 गडी गमावून 143 धावांचा डोंगर उभा केला. संघाच्या अमित यादवने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. तर एस.व्ही. सिंग (30), पी.पुनिया (28), आर.के.सिंग (22) यांनी देखील संघाचा धावफलक वाढता ठेवण्यात योगदान दिले. प्रत्युत्तरा आलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाला एचक्यूएमसी संघाने अवघ्या 81 धावांत 9 गडी बाद करून रोखले. विजेत्या संघाच्या आर.के. सिंगने 3 गडी बाद केले तर विपुल राणा, अमित यादव यांनी अवघे 5 आणि 8 धावा देत प्रत्येकी 2 गडी टिपले.