– मेयो हॉस्पिटल जवळ अतिक्रमणचा सफाया
नागपूर :- नागपूर शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाद्वारे सुरु असलेल्या कारवाईला गती देण्यात आल्यांनतर शुक्रवारी (ता.१०)देखील पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने विविध झोनमध्ये शुक्रवारी धडक कारवाई करण्यात आली. प्रवर्तन विभागामार्फत कारवाईत अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे. बांधकाम करण्यात आलेले अतिक्रमण पाडण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार प्रवर्तन विभागाद्वारे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
प्रवर्तन विभागातर्फे शुक्रवारी (ता.१०) सकाळी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो हॉस्पिटल)जवळ मोठी कारवाई करण्यात आली. येथे तीन ठेले जप्त करण्यात आले आणि शेड तोडण्यात आले. तर मंगळवारी झोनमध्ये जरीपटका येथील जिंजर माल येथे अतिक्रमण विभागातर्फे १४ ठेले आणि दुकानाचे २ काउंटर जप्त करण्यात आले. याशिवाय ग्रामीण प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)जवळ बुफे टेबल, स्टूल, खुर्च्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सायंकाळी जरीपटका येथील जिंजर माल येथे अतिक्रमण कारवाई करण्यात आली. सीताबर्डी येथे २ लोखंडी ट्रॉली, ३ लोखंडी स्टॅन्ड, ३ बोरे कपडे आणि एक मोठा काउंटर ठेला जप्त करण्यात आला. याशिवाय अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे कॅन्सर हॉस्पिटल येथे सायंकाळी कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्या मार्गदशनात अतिक्रमण पथक प्रमुख भास्कर माळवे, संजय कांबळे, शहदाब खान, उपद्रव्य शोध पथक आणि पोलीस प्रशासन यांच्याद्वारे संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली.