पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री

– नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार तर क्षतीग्रस्त घरांना १० हजार सानुग्रह अनुदान

– केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची अंबाझरी व नागनदीच्या कायमस्वरूपी उपाययोजनेची सूचना

नागपूर :- शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे नागपुरात उद्भवलेली पूर परिस्थिती अघटित असली तरी अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्या कुटुंबाला दहा हजार रुपये प्रत्येकी तर दुकानाचे नुकसान झालेल्यांना ५० हजार रुपये प्रत्येकी सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती आज आढावा बैठकीनंतर देण्यात आली.

शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. यामुळे जवळपास दहा हजार घरांना नुकसान पोहोचले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेमध्ये आज संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेली घटना ही २५-३० वर्षात होणारा एखादा अघटीत घटनाक्रम आहे. अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीत तीन नागरिक मृत्युमुखी पडले असून १४ जनावर दगावले आहेत. सर्व घटनाक्रमांचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे.एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अवघ्या तीन तासांमध्ये दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आणली. अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाने बचाव कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरातील ज्या घरांमध्ये पाणी शिरले त्या घराची साफसफाई करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने घेतली आहे. उद्या पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. कोणत्याही घरामध्ये गाळ साचला राहणार नाही. निवारा केंद्रामध्ये असणाऱ्या नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्णतः क्षतीग्रस्त अशा प्रत्येक कुटुंबाला,घराला प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान, पूर्णत: नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार अनुदान तर पक्क्या दुकानाशिवाय ज्यांच्या हातगाडीचे, रस्त्यावरील ठेल्याचे नुकसान झाले आहे.त्यांनाही दहा हजाराची मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अंबाझरी तलावाच्या मजबुतीसाठी कायमस्वरूपी संरक्षण भिंत, काही नवीन पुलांचे बांधकाम करण्याची सूचना महानगरपालिकेला करण्यात आली आहे. संपूर्ण बंधाऱ्याचे मजबुतीकरण करताना पाटबंधारे विभाग या कामांमध्ये एजन्सीचे काम करेल, राज्य सरकार यासाठी निधी उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज अनेक ठिकाणची वीज बंद करण्यात आली होती, बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत. मात्र हा निर्णय सुरक्षिततेच्या कारणाने घेण्यात आलेला आहे. कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाची दाट शक्यता आहे. प्रशासन उद्याच्या प्रतिबंधात्मक तयारीसाठी सज्ज आहे. त्यामुळे उद्या जर पाऊस असेल तर गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.उद्या नुकसान झालेल्या काही ठिकाणी भेट देणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

या पुरामध्ये १४ जनावरे दगावली. पशुपालक योगेश वऱ्हाडकर यांना या बैठकीपूर्वी स्वयंसेवी संस्थेच्यावतीने एक लक्ष रुपयाचा धनादेश गडकरी व फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.

या बैठकीला आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,मनपा आयुक्त डॉ. अभीजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन सरसावले

Sun Sep 24 , 2023
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मदत सुपूर्द नागपूर :- शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नागपुरात दाणादाण उडविली. अनेक घरात, दुकानात पाणी शिरले. घरे उद्ध्वस्त झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य पोचविण्याचे आदेश देतानाच स्वयंसेवी संस्थांनीही मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला दाद देत नाम फाउंडेशन मदतीसाठी पुढे आले. नाम फाउंडेशनने दिलेली मदत खुद्द ना. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!