मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत आमदार पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अन् प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. तसेच राजकीय प्रश्नावर चर्चा केली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच सकारात्मक बातमी मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांकडून मिळाले आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.
काय झाली चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्यानंतर एसटी महामंडळाकडून परिपत्रक त्यातील अटी शिथिल केल्या नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जाहीर करावा, संप दरम्यान गैरहजर राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमित करावी, या मागण्यांवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या एमडीला योग्य सूचना दिल्या. त्यांनी काही दिवसांत परिपत्रक रद्द करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.