नागपूर :- भारत सरकारची विज्ञान प्रसार संस्था, नागपूर महानगरपालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्यूकेशन (एआरटीबीएसई) यांच्या संयुक्त विद्यमाने अपूर्व विज्ञान मेळाव्याचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. अपूर्व विज्ञान मेळावा-२०२२च्या दुस-या दिवशी विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींनी गर्दी करीत सहज सोप्या प्रयोगातून विज्ञानाची किमया दर्शविणा-या प्रयोगांचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, हसत खेळत विद्यान शिकविणारा अपूर्व विज्ञान मेळावा १९९८ पासून अविरत सुरू आहे. यंदाचे मेळाव्याचे २५वे वर्ष असून हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.आश्चर्य! ग्लास उलट केल्यानंतर पाणी सांडत नाही…
अपूर्व विज्ञान मेळाव्यात वैज्ञानिक प्रयोगातून विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि त्यांची कल्पकता पहायला मिळत आहे. पाण्याने भरलेल्या ग्लासावर धारके लावून ग्लास उलट केलयानंतरही पाणी खाली सांडत नाही. दोन वेगवेगळी चित्रे दोन वेगवेगळ्या डोळ्यांनी वेगळे पाहिल्यास तळहातावर छिद्र दिसणारे प्रयोग विद्यार्थ्यांची कुतूहलता अधिक वाढवित आहेत. लेटर इन्व्हर्सन समजावून देण्यासाठी दोन आरशांना एका विशिष्ट कोनात जोडण्यात आले आहे. यात उजवे कान पकडल्यास आरशात डावे कान पकडलेले दिसत आहे. अशा अनेक प्रयोगांतून सहज आणि सोप्या भाषेत विज्ञानाचे ज्ञान दिले जात आहे.
रंग बदलणारे कुंकू
रसायनशास्त्रातील वाटर ऑफ क्रिस्टलायजेशन ची भूमिका समजावून सांगण्यासाठी रंग बदलणा-या कुंकवाचे प्रयोग दाखविण्यात येत आहे. उष्णता दिल्याने कुंकू रंग बदलतो आणि थंड झाल्यानंतर पुन्हा आपल्या मुळ रंगात येतो. तर रिलेशन बिट्विन प्रेशर अँड एरिया समजाविण्यासाठी कागदी खांबांवर क्षमतेपेक्षा जास्त वजन ठेवण्याचे प्रयोगही आकर्षित करीत आहे.
चित्रातल्या पंडितजींची हलणारी शिखा
आपली दृष्टी काही सेकंद स्थिर होत असल्याचे दर्शविणा-या प्रयोगात पंडितजींचा फोटो दोन कागदांवर वेगाने हलवून पंडितजींची शिखा (शेंडी) हलताना दिसत आहे. यासोबतच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या नियमांची माहिती देणार्या सोप्या प्रयोगांची मालिका सुरू होते. गुरुत्वाकर्षण केंद्राचा सिद्धांत असो किंवा चुंबकीय क्षेत्र असो, महानगरपालिकेच्या शाळेतील ही लहान मुले त्यांच्या प्रयोगांची माहिती पूर्ण आत्मविश्वाने उपस्थितांना देत आहेत. विशेष म्हणजे, आज विद्यार्थ्यांसोबतच मोठ्यांनीही प्रयोगांमध्ये विशेष आवड दाखविली आहे. अपूर्व विज्ञान मेळाव्यात एका शाळकरी मुलाने एक लहान लाकडी स्केल तारेला बांधून तो आवाज बाहेर येण्यासाठी फिरवला. तर, लगेचच दुस-या मुलाने तोंडातून बाहेर पडणाऱ्या आवाजाशी त्याची तुलना केली. लहान मुलांचा हा आत्मविश्वास पाहून मेळाव्याच्या माध्यमातून, विज्ञानाची मूलभूत तत्त्वे सहज समजावून सांगण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे. प्रयोगातूनच जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.
मनोरंजक पुस्तकांचे विश्व
अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी राष्ट्रभाषा भवन परिसरात प्रवेश करताच लोकांच्या नजरा पुस्तकांच्या स्टॉलवर पडतात. ही पुस्तके एकलव्य प्रकाशन, भोपाळने विशेषत: विज्ञान मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. इथली बहुतेक पुस्तके वैज्ञानिक प्रयोगावर आधारित आहेत. यात, चार्ट, मॉड्यूलचा समावेश आहे. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान सोपे आणि लोकप्रिय बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. शरिराची रचना, त्वचा, पेशींचे विवरण इत्यादी गोष्टी समजण्यास सुलभ मॉड्यूल्सच्या पुस्तकांमध्ये प्रमुख घटक आहेत. येथे लहान मुलांसाठी चित्रकथांची पुस्तकेही नाममात्र किंमतीत उपलब्ध करून दिली आहेत. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ही पुस्तके आहेत. मेंदूविकास संचाअंतर्गत ९ पुस्तके आहेत जी लहान मुलांना तसेच मोठ्यांना मेंदू सक्रीर्य करायला भाग पाडतात. खेळाच्या माध्यमातून शिकण्याच्या धर्तीवर शाळांमध्ये मोकळ्या वेळेत मुलांनाही हे देता येईल अशा प्रकारची ही पुस्तके आहेत. एकूणच, मुलांच्या मानसिक विकासासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांची उत्सुकता शांत करण्यासाठी उपयुक्त पुस्तकांचा संग्रह येथे आहे.
२० नोंव्हेंबर पर्यंत अपूर्व विज्ञान मेळावा
अपूर्व विज्ञान मेळावा विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींसाठी राष्ट्रभाषा भवन परिसरात (उत्तर अंबाझरी मार्ग, आंध्र असोसिएशन इमारतीच्या समोर) येथे २० नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सुरू आहे. मेळाव्यात प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रभाषा भवन (फोन ०७१२ – २५२३१६२) येथे संपर्क साधता येईल.