कुणाल कुमार यांनी घेतला शहरातील स्मार्ट सिटीच्या विकास कामांचा आढावा

मनपा प्रशासक तथा आयुक्तांनी दिली स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती : कमांड अँड कंट्रोल सेंटरची केली पाहणी

नागपूर, ता. २६ : केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि स्मार्ट सिटी मिशनचे डायरेक्टर  कुणाल कुमार यांनी मंगळवारी (ता. २६) नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नागपूर शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पोलिस आयुक्तालयासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ची पाहणी केली. या सेंटरचे बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. त्यांनी लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ‘स्टेट ऑफ आर्ट कमांड अँड कंट्रोल सेंटर’ नागपूर स्मार्ट सिटीतर्फे उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ३२ मोठे स्क्रीन लावण्यात आले आहे. नागपूर पोलिस या केंद्रातून शहरात लावण्यात आलेल्या ३६०० कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागपुरातील सराईत गुन्हेगारांवर निगा ठेवणार आहेत. या माध्यमातून पोलिस विभागाला एकाच ठिकाणावरून शहरातील वाहतूक नियंत्रण व डायल ११२ च्या माध्यमातून विविध सुरक्षा व्यवस्था तत्परतेने पुरविता येईल.

नागपूर स्मार्ट सिटीच्या सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीत नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीच्या मुख्य वित्त अधिकारी  नेहा झा, कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, इन्फ्रा विभागाचे महाव्यस्थापक  राजेश दुफारे, ई-गव्हर्नन्स विभागाचे महाव्यस्थापक डॉ. शील घुले, नियोजन विभागाचे प्रमुख राहुल पांडे, पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रारंभी मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी यांनी पुष्पगुच्छ देऊन कुणाल कुमार यांचे स्वागत केले. त्यानंतर  कुणाल कुमार यांनी पूर्व नागपूर येथे सुरु असलेल्या नागपूर स्मार्ट सिटीच्या विकास कामांची पाहणी केली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती यावेळी दिली. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीतर्फे मौजा पारडी, पुनापूर, भरतवाडा आणि भांडेवाडी येथे १७३० एकरात ‘टेंडर सुअर’ प्रकल्पांतर्गत ४९.४२ किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये ३० मीटर, २४ मीटर, १८ मीटर, आणि ९ मीटर रुंदीच्या रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय १० पुलांचे काम, ४ जलकुंभांचे काम, एलईडी लाईट, मलनिस्सारण व्यवस्था, पाणी पुरवठा इत्यादी कार्य सुद्धा प्रगतीपथावर आहेत. होम स्वीट होम प्रकल्पामध्ये सदनिकांचे निर्माण काम सुरु झाले आहे. येथे मुलांकरिता खेळण्याची जागा, उद्यान, पार्किंग सुविधा, खेळण्याचे मैदान प्रस्तावित असून ही इमारत हरित इमारत असणार आहे. तसेच मौजा पुनापूर येथे प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी भूखंड पडून अभिन्यास तयार करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘बायोमायनिंग प्रकल्प’ उभारण्यात आले आहे. या प्रकल्पासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पामुळे डम्पिंग यार्ड परिसरात वर्षानुवर्षापासून साचलेल्या कच-याची विल्हेवाट लावता येणार असून कच-यामुळे गुंतलेली जागा मोकळी होईल. याशिवाय स्मार्ट सिटीतर्फे १५ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देत संपूर्ण शहरात जास्तीत जास्त चार्जींग स्टेशन तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी दिली.

नागपूर सेफ अँड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत संपूर्ण काम झाले असून पोलिस आयुक्तालयासाठी ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’चे बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटरच्या माध्यमातून गुन्ह्यांचा शोध व उकल तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाला अतुलनीय मदत प्राप्त होत आहे. यामाध्यमातून शहरातील वाहतुकीला सुद्धा शिस्त लावण्यास मदत होत आहे, याबाबत माहिती सुद्धा यावेळी मनपा प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी  कुणाल कुमार यांना दिली.

यावेळी केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि स्मार्ट सिटी मिशनचे डायरेक्टर कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची पाहणी करताना त्यामध्ये काही महत्वपूर्ण सूचना केल्या. स्मार्ट सिटीच्या कार्याची त्यांनी प्रसंशा केली. स्मार्ट सिटीतर्फे कार्य सुरू असलेल्या ‘एबीडी एरीया’ व्यतिरिक्त शहराच्या इतर भागातही जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा मिळावी, यादृष्टीने कार्य करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खाजगी क्षेत्राची भागीदारी घेऊनच वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण करण्यावर भर - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Tue Apr 26 , 2022
वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी पीपीपी धोरण महत्त्वपूर्ण ठरणार– उद्योग मंत्री सुभाष देसाई             मुंबई, दि. 26 : सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्याचे उद्दिष्ट सन २०३० पर्यंत ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैद्यकीय सेवा क्षेत्राचे खाजगीकरण न करता सार्वजनिक खाजगी भागीदारीने राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.             राज्यातील वैद्यकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com