– शाळकरी विद्यार्थ्यांनी जाणून घेतली निरनिराळ्या वनस्पती औषधीच्यां झाडांची माहिती
– लता मंगेशकर उद्यानातील ‘पुष्पोत्सव २०२४’ नक्की भेट द्या; मनपाचे आवाहन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित आहेत.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात उद्यान विभागाद्वारे पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानात पहिल्यांदाच मनमोहक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (ता.12) विविध शाळेच्या विद्यार्थांना ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला भेट देत निरनिराळ्या वनस्पती औषधीच्यां झाडांची माहिती जाणून घेतली. यात ललिता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मध्य भारतात आढळणाऱ्या देश झाडांचे विविध उपयोग जाणून घेतले. रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी झाडे, धुऱ्यावरची झाडे आदींच्या माहितीसह निरनिराळ्या प्रकारचे शोभिवंत फूलं, आकर्षक पुष्परचना असणाऱ्या मनमोहक ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला बघून विद्यार्थांनी आनंद व्यक्त केला.
याशिवाय मुलांना माती कले विषयी गोडवा निर्माण व्हावा याकरिता घेण्यात आलेल्या विशेष सत्राद्वारे विद्यार्थांनी मातीची भांडी, कलाकुसर नाविन्यपूर्ण कलाकृती प्रत्यक्ष तयार केली. तर फुलांनी सजलेल्या आकर्षक रेल्वे गाडीत बसून छायाचित्र काढले. पुष्पोत्सव प्रदर्शनात झेंडू, पिटोनिया, डायनथस, देहेलिया, गुलाब, जर्बेरा, कॅलेंडुला, प्लँटेला, झिनिया यासारखे १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुले, औषधी वनस्पतीची झाडे एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळतं आहेत. याशिवाय या फुलांच्या संदर्भात सविस्तर माहिती देखील तज्ज्ञांमार्फत नागरिकांना दिली जात आहे. तरी नागरिकांनी पुष्पोत्सव २०२४’ ला भेट द्यावी असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.