शहरात तब्बल १ लाख ४० हजार ५३७ गणेश मूर्तींचे विसर्जन : पीओपी मूर्तींचे प्रमाण घटले
नागपूर :- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर म्हणत नागपूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. श्रीगणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवानिमित्त शहरातील दहाही झोन अंतर्गत तब्बल १ लाख ४० हजार ५३७ इतक्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून कृत्रिम विजर्सन कुंडांमध्ये श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याच्या मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागपूरकरांचे कौतुक करीत आभार मानले आहे.
गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये, याकरिता नागपूर महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. गणेश विसर्जनासाठी एक हजाराहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मनपाद्वारे विसर्जनासाठी प्रभाग निहाय २०४ ठिकाणी ३९० कृत्रिम तलाव आणि २४ हून अधिक फिरते विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच ४ फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीसाठी कोराडी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या सुविधेचा लाभ घेत नागरिकांनी श्रींचे विसर्जन केले. याशिवाय शेकडो नागरिकांनी घरीच मूर्तींचे विसर्जन केले. गणेश मूर्ती विजर्सनासह मनपाद्वारे १४२.२५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मनपा प्रशासनाद्वारे शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, नाईक तलाव, लेंडी तलाव, पोलिस लाईन टाकळी यासह सर्वच तलावांमध्ये विसर्जनास पूर्णत: बंदी घालण्यात आली होती. या सर्व ठिकाणी लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात आली होती. कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात आली होती. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाईट लावण्यात आले होते. याशिवाय झोननिहाय २४ रबरी पूल व जागोजागी निर्माल्य संकलनासाठी ९३ कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच नागरिकांना त्यांच्या घरापुढे, परिसरात श्रीगणेशाचे विसर्जन करता यावे याकरिता फिरते विसर्जन कुंडाचीही व्यवस्था करण्यात आली होती. फिरत्या विसर्जन कुंडाच्या उपलब्धतेकरिता मनपाद्वारे झोनस्तरीय संपर्क क्रमांक जारी करण्यात आले होते, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
श्रीगणेशाच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रभाग निहाय ३९० कृत्रिम विजर्सन तलावांची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये मातीच्या १ लाख २९ हजार १२० मूर्तीचे तर ११ हजार ४१७ पीओपी मूर्ती अशा एकूण १ लाख ४० हजार ५३७ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पीओपी मूर्तींची खरेदी, विक्री व आयातीवर बंदी आणल्यानंतर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले. यावर्षी गणेश विसर्जनामध्ये अत्यल्प पीओपी मूर्तींचे विसर्जन झाल्याचे दिसून आले. शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर या तलाव परिसरात विसर्जन व्यवस्थेसह आपत्कालीन स्थितीसाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती, असेही डॉ. महल्ले यांनी सांगितले.
नागरिकांनी नाकारली पीओपी मूर्ती
गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची स्थापना ही पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. यासंबंधी कठोर कायदे सुद्धा करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने नागरिकांमध्ये सुद्धा जागृती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी आतापर्यंत झालेल्या गणेश विसर्जनामध्ये ८ टक्के पीओपी मूर्तींचे विसर्जन झाल्याचे दिसून आले.शहरातील विविध भागातील कृत्रिम विसर्जन टँकमध्ये एकूण १,४०,५३७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यापैकी केवळ ११,४१७ पीओपी मूर्ती असल्याचे पुढे आले आहे. हे प्रमाण एकूण विसर्जनाच्या ८ टक्के एवढेही नाही.