Ø नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची आढावा बैठक
Ø सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत खर्चाचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना
नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते या विषयांवर प्राधान्याने निधी वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिल्या. तसेच, या महिन्या अखेरपर्यंत खर्चाचे सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात डॉ. इटनकर यांनी जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या परिक्षेत्रातील विविध विषयांची आढावा बैठक घेतली. आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
उपलब्ध निधीपैकी शिक्षण, आरोग्य, रस्ते बांधकाम या कामांना प्राधान्याने निधी वितरीत करण्याचे तसेच घनकचरा व्यवस्थापन, वाचनलाय, पथदिवे, क्रीडा मैदान आदी कामांसाठी निधी वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ज्या नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत आहेत त्यांनी लोकोपयोगी कामांची अंमलबजावणी करण्याकरिता या संस्थांचे माजी लोकनियुक्त सदस्य, विद्यमान व माजी आमदार यांच्या सोबत बैठक घेऊन निधी वितरणाचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. निधी उपलब्धतेच्या माहितीसह प्रस्तावित कामांकरिता आवश्यक निधींच्या मागणीचे प्रस्ताव या महिन्याअखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दलीत वस्ती सुधार निधी, शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जिल्हा क्रीडा संकुल, पवनी येथील ओव्हरब्रीज आदी विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.