ई-पंचनाम्यानंतर लवकरच ई-नझुल उपक्रम राबविणार – विभागीय आयुक्त

– महसूल सप्ताहाचे उदघाटन

– उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

नागपूर :- नागपूर विभागात ई पंचनामे पद्धती प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. देशात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमानंतर ई –नझुल हा उपक्रम नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात जिल्हास्तरावर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात महसूल सप्ताहाचे उदघाटन आयुक्त बिदरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विजय आनंद, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, महसूल उपायुक्त दिपाली मोतीयेळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या उदघाटनपर भाषणात  बिदरी पुढे म्हणाल्या की, कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सर्वसामान्य जनतेशी संवाद, प्रतिक्रिया तसेच कार्यतत्परता यावर शासनाची सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिमा अवलंबून असते. शासनस्तरावर राबविण्यात येणारी ‘ई पद्धती’ शासकीय कामकाजात उपयुक्त ठरत आहे. नागपूर विभागात ई- चावडी, ई-मोजणी या ऑनलाईन पद्धती राबविण्यात येत आहे. नझूल विभागाच्याही अनेक अडचणी आहेत. या अडचणी दूर होण्यास मदतीसाठी लवकरच ई-नझूल तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात येणार आहे. ई नझूल हा उपक्रम नागपूर जिल्ह्यात सर्वप्रथम राबविण्यात येईल. यशस्वीतेनंतर संपूर्ण विभागात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याच्या बिदरी पुढे म्हणाल्या.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले की, यंदा पहिल्यांदाच महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर या सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काम करताना कर्मचाऱ्यांना अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रकृतीकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची खाजगी रुग्णालयातून आरोग्य तपासणी तसेच घरे उपलब्ध व्हावीत यासाठी येत्या काळात प्रयत्नरत राहणार असल्याचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान महसूल विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्याया अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच कोतवाल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाच जणांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी (नागपूर शहर) हरिष भामरे यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑरगनायजेशन -एनएसएसओ नागपूरद्वारे ग्राहक मूल्य निर्देशांकावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर

Wed Aug 2 , 2023
नागपूर :- भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (फील्ड ऑपरेशन्स डिवीजन) 01/08/2023 रोजी संगोष्ठी हॉल, समंक विधायन केंद्र, सीजीओ कॉम्प्लेक्स सेमिनरी हिल्स, नागपूर याणी ग्राहक मूल्य निर्देशांकावर (शहरी/ग्रामीण) विभागीय प्रशिक्षण परिषदेचा समारंभ झोनल ऑफिस (पश्चिम अंचल), नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (फील्ड ऑपरेशन्स डिवीजन) यांनी आयोजित केले होते. राजेंद्र सी. गौतम, उप महासंचालक आणि पश्चिम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!