– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर
मुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्र-काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठक, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण आदी कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी काश्मिरकडे प्रयाण केले. त्यांच्या समवेत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित आहेत.
पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या ‘हम सब एक है’ या विशेष कार्यक्रमासह महाराष्ट्र काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात म्हणून काश्मिर मधील 73 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी श्रीनगर येथे हा कार्यक्रम होत आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीर मधील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेत.
कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन
सोमवार दि. 18 सप्टेंबरला कारगिल येथे सकाळी सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉ. अली इराणी तसेच फिजिओथेरपी डॉक्टरांद्वारे कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त आयोजित वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. छानीगुंड येथे सरहद संस्थेच्या माध्यमातून भारतीय लष्करासाठीच्या 72 फुटी तिरंगा झेंड्याचे अनावरण देखील मुख्यमंत्री करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्रास येथील युद्ध स्मारकाला देखील भेट देणार असून यावेळी ते लष्कराचे अधिकारी आणि जवानांशी संवाद साधणार आहेत. जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन देखील मुख्यमंत्री करणार आहेत. या दोन दिवसांच्या या काश्मीर दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र- काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.