नागपूर : अमर सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. गोविंदराव वंजारी यांच्या पुण्यतिथी निमित्त कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, येथे नुकत्याच झालेल्या 10 नोव्हेंबर रोजी कमला नेहरू महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकरिता ‘स्मृतीगंध’:गंध जुन्या स्मृतींचा, स्वर्णिम आठवणीचा’ या भव्य संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी स्व.आमदार गोविंदराव वंजारी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध सांस्कृतिक आणि क्रिडा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ‘स्मृतीगंध’ गंध जुन्या स्मृतींचा, स्वर्णिम आठवणीचा’ या भव्यसंगीत स्पर्धेचे आयोजन केले.
यास्पर्धेमध्ये मो.रफी, किशोरकुमार, मुकेश आणि मन्ना डे यांनी गायलेले सदाबहार गाणी स्पर्धकांनी सादर केलीत. याप्रसंगी महाविद्यालयातील पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीत दिग्दर्शक तथा गायक मोरेश्वर निस्ताने ह्यांनी गझल व काही गीते सादर करून सर्वांची मने जिंकली. स्पर्धेच्या विजेत्या वैष्णवी निंबुळकर हिला प्रथम पारितोषिक रू. 5001 रोख व स्मृतीचिन्ह, चंदन भावे ह्याला द्वितीय पारितोषिक रू. 3001 रोख व स्मृतीचिन्ह, भावना चौधरी हिला तृतीय पारितोषिक रू. 2001 रोख व स्मृतीचिन्ह तसेच अक्षय देशमुख व चेतना मिराशे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रत्येकी रु. 1001/- रोख व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. या स्पर्धेकरिता परिक्षक म्हणून श्याम देशपांडे व अहिंसा उबाळे (तिरपुडे) ह्यांनी काम पार पाडले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.ऋषिकेश लाखे तर आभार प्रा.प्रिती महाजन यांनी मानले. याकार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक, उपप्राचार्य डॉ. प्रदिप दहीकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कमला नेहरू महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.