23 सप्टेंबरला योजनेला 4 वर्ष पूर्ण
आज मौदा व सोमलवाडा येथे शिबीर
नागपूर :- जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अभियानात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आयुष्यमान कार्ड वाटप उपक्रम सुरू केला आहे. शेकडो आजारांसाठी लाभदायी ठरणारे हे कार्ड आपल्याकडे असावे यासाठी नागरिकांनी पुढे येऊन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आयुष्यमान कार्डमध्ये राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व आजार घेतले जातात. महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत राज्य शासन 996 आजारांसाठी मदत करते. तर केंद्राच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1209 आजार समाविष्ट केले जातात. मोफत उपचारासाठी यापुढे या कार्डची गरज भासणार असून केंद्र शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चार वर्षांपूर्वी 23 सप्टेंबर 2018 ला आयुष्यमान कार्ड अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानाला 23 सप्टेंबरला चार वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त जिल्ह्याच्या विविध भागात आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात शिबिर आयोजित केले आहे. आज रामटेक येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. उद्या 20 तारखेला ग्रामीण रुग्णालय मौदा व शहरांमध्ये सोमलवाडा येथे लाभार्थ्यांना कार्ड वितरण केले जाणार आहे. 21 सप्टेंबरला ग्रामीण रुग्णालय उमरेड, हिंगणा, पाचगाव, या ठिकाणी कार्ड वाटपासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 23 तारखेला सावनेर व कामठी 24 ला देवलापार, 26 ला भिवापूर व मोहपा, 28 ला कळमेश्वर व नरखेड 30 ला सिरसी येथे अभियान आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्ड वाटपाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.