संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-निवडणूक लढण्यासाठी महिला उत्सुक
कामठी ता प्र 17:-कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे.निवडणुका कधी लागणार, प्रभाग निश्चिती व प्रभागातील आरक्षण सोडत व मतदार यादी चा कार्यक्रम एकापाठोपाठ एक लागल्या. शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
1 जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असून यासाठी राजकीय पक्ष आता पूर्णपणे कामी लागले असून आरक्षण सोडतीनंतर राखीव असलेल्या प्रभागात कोण महिला व पुरुष उमेदवार राहील याची चाचपणी सध्या राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.दावेदार अनेक आहेत परंतु जो उमेदवार योग्य आहे असे राजकीय पुढाऱ्यांना वाटेल तोच उमेदवार अंतिम करण्यात येणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.त्यामुळे राखीव जागांवर अभ्यास करून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.सध्या ओबीसी आरक्षण न घेता आरक्षण सोडत निघाली आहे परंतु जर ओबीसी आरक्षणावर निर्णय झाला आणि ओबीसी आरक्षण मिळाले तर काय भूमिका घ्यायची किंवा नाही , मिळाले तर कोण उमेदवार निवडायचा यासाठी चाचपणी सुरू आहे.योग्य उमेदवार कोण राहील यासाठी प्रभाग निहाय बैठकीनी आता जोर धरला आहे.त्यामुळे राजकीय वातावरण निर्मितीही होऊ लागली आहे.स्थानिक पातळीवर इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे.पक्षातील नेतेही कामाला लागले आहेत.जुलै महिन्यानंतर नगर परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे परंतु त्या पूर्वी पासून इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे.राखिव पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आतापासूनच तहसील कार्यालयात गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.
-50 टक्के आरक्षणामुळे महिला वर्ग निवडणुक लढण्यास इच्छुक
कामठी नगर परिषद च्या निवडणुकीत 50 टक्के महिला राखीव जागा असून 34 पैकी 17 सदस्य महिला निवडून येणार हे निश्चिती झाले आहे.तर शहरातील काही प्रभागात महिला आरक्षण निघाल्याने इच्छुक पुरुष उमेदवारांच्या निश्चितेवर पाणी फेरले त्यामुळे इच्छुक पुरुष उमेदवारांच्या अपेक्षांचा भंग झाला मात्र घरातील कुणीतरी महिला उमेदवार उभे करण्याची तयारी इच्छुक पुरुष उमेदवारांनी दर्शविली आहे. ऐन वेळी नगर परिषद निवडणुकीत कोण उमेदवार कुठल्या पार्टीकडून लढेल हे वेळे पर्यंत सांगणे कठीण जाणार आहे.