विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचा गुणगौरव समारंभ
अमरावती : कुंभार समाजातील अनेकजण प्रशासकीय यंत्रणेत उच्च पदे भूषवित आहे. आयएएस, आयपीएस, सचिव अश्या समाजातील उच्च पदस्थांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश दरेकर यांनी केले. बडनेरा रोडवरील शशिनगर स्थित श्री संत गोरोबा काका सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या गुणगौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून दरेकर बोलत होते. विदर्भ कुंभार समाज समितीच्या अमरावतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कुंभार समाजाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. समाजातील तरुण शैक्षणिक, क्रीडा, संगीत, शास्त्र, विज्ञान आदी विषयांमध्ये पारंगत झाली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील पुढील पिढीला व्हावा. नवोदितांना प्रेरणा मिळावी म्हणून या गुणगौरव समारंभाचे विशेष महत्व असल्याचे दरेकर पुढे बोलताना म्हणाले. समाजातील तरुण उद्योग, स्वयंरोजगार करण्यास पुढे आल्यास त्यांना सामाजिक संस्था मार्गदर्शन तसेच मदत करणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय गुणगौरव झालेल्या गुणवंत विद्यार्थी, समाजातील गौरव, भूषण असलेल्या व्यक्तिंना त्यांनी भाषणातून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार रवी राणा, कुंभार सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, सरचिटणीस बबनराव जगदाळे, प्रदेश उपाध्यक्ष वसंतसेठ घोडनदीकर, कोषाध्यक्ष अनंत कुमार, सरचिटणीस अजय विरकर, सदस्य संजय रुईकार, प्रकाश भालेराव, शस्त्रृघ्न प्रजापती, श्री संत गोरोबा काका समाजोन्नती बहुउद्देशीय समितीचे अध्यक्ष पंजाबराव काकडे, सचिव डॉ. श्रीराम कोल्हे, कार्याध्यक्ष सुरेश नांदूरकर, विदर्भ कुंभार समितीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. संजय साळवीकर, माजी अध्यक्ष देवीदास धामणकर, प्रभा भागवत, महिला अध्यक्ष संगिता सावळीकर, भगवान जामकर, अरुण पोहनकर यांची विशेष उपस्थिती होती.
समाज भूषण, गौरव पुरस्काराचे वितरण
या कार्यक्रमात दहावी, बारावी, पदवी, पदव्यूत्तर परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष थेरगाव पुणे येथील सतिश दरेकर यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यवतमाळ येथील उद्योजक राजू उर्फ शत्रृघ्न गंगादीन प्रजापती यांचा समाजभूषण, दर्यापूर वडाळगव्हाण येथील सुभाष नामदेवराव वडूरकर यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नागपूर येथील राम वासुदेव पवनारकर, नाशिक येथील नंदूभाऊ जाधव, अकोला जिल्ह्यातील नया अंदूरा येथील प्रदीप तुकाराम मांगुळकर, प्रा. डॉ. मनोहर दादाराव मेहरे, आर्णी येथील डॉ. रोशन माधव मेहरे, चांदूर बाजार हिरुळपूर्णा येथील अतुल रंगराव भातकुलकर, वाशिम जिल्ह्याच्या मंगरूळपीर येथील वनमाला परशराम पेंढारकर, मलकापूर अकोला येथील आदर्श तळोकार यांचा समाज गौरव देत सन्मान करण्यात आला.
विद्याथ्र्यांचा गौरवप्रमाणपत्र देवून सन्मान
कुंभार समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांचा यावेळी मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. दहावी व बारावी, पदवी व पद्व्युत्तर परीक्षेत उच्चत्तम गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
सभागृहासाठी 25 लाख
शशिनगर येथील संत गोरोबा काका भवन येथे सभागृहाचे बांधकाम करता यावे म्हणून 25 लाख रुपये तर प्रवेशद्वाराकरिता 10 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष सुधाकर, शेंडोकार, उपाध्यक्ष अॅड. गजानन तांबटकर, कोषाध्यक्ष सतिश गावंडे, सचिव सुरेंद्र सरोदे, सहसचिव मधुकर खांडेकर, सुनील भागवत, नंदकिशोर काकडे, विद्यार्थी सहाय्यता निधी समितीचे अध्यक्ष सुरेश नांदूरकर, रामेश्वर वडूरकर, नंदकिशोर नांदूरकर यांच्यासह सदस्यांनी प्रयत्न केले.
सुरूवातीला संत गोरोबा काकांच्या मूर्तिचे मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले. महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष रमाकांतजी क्षीरसागर, सरचिटणीस बबन जगदाळे, संजय रूईकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक डॉ. श्रीराम कोल्हे यांनी, पाहुण्यांचा परिचय डॉ. सुधाकर शेंडोकार यांनी करून दिला. संचालन डॉ. विलास नांदुरकर, प्राजंली काळबांडे यांनी तर आभार सचिव सुरेंद्र सरोदे यांनी मानले. गुणगौरव कार्यक्रमाला विदर्भातील कुंभार समाज बांधव तसेच गुणवंत विद्यार्थी मोठ संख्येने उपस्थित होते.