मुंबई दि. १९ जानेवारी – नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
आज राज्यातील नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबाजुने दिसत आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढली आहे तर काही ठिकाणी सेनेबरोबर तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत असे असताना मतांचे विभाजन होऊनही जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला कौल टाकला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
राष्ट्रवादीतील नवीन नेते रोहित पवार, सुनील शेळके, रोहित पाटील यांनी दोन तीन वर्ष आपल्या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे. मात्र काही अनुभवी नेत्यांच्या मतदारसंघात पक्षाला यश मिळाले नाही त्याचे आत्मपरीक्षण करून कारणे शोधली पाहिजे. व्यवस्थित लक्ष दिले तर राष्ट्रवादीला लोकं स्वीकारत आहेत हे आजच्या निकालावरून स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले.