– अभियंता, सरपंच व प्रतिनिधींनी केली पाहणी
कामठी :- कामठी तालुक्यातील रनाळा ग्रामपंचायतीच्या रनाळा येथील विठ्ठल रक्मिणी मंदिर ते राज रॉयल या कच्च्या रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा मार्ग पुढे नागपूर महामार्गाला मिळतो. त्यामुळे या मार्गावर जास्त रहदारी असते. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवून मार्ग काढावा लागत आहे. एकूणच हा रस्ता लोकांसाठी त्रासदायक ठरला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी रनाळा ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज साबळे यांच्याकडे तक्रार केली असता सरपंच साबळे यांनी तातडीने याची दखल घेत कामाला सुरुवात केली. या रस्त्याचा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्यासमोर ठेवण्यात आला. त्यावर आमदार बावनकुळे व सावरकर यांनी तातडीने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत रस्त्यासाठी साडेतीन कोटी ( 3.5) रुपयांचा निधी मंजूर केला.
रनाळ्याच्या विठ्ठल रक्मिणी मंदिर ते राज रॉयलपर्यंत पक्के रस्ता बांधण्याची मागणी लक्षात घेऊन सरपंच साबळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे लवकरच येथे डामर रस्ता तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात सोमवारी सरपंच पंकज साबळे, येरखेडाचे माजी सरपंच मनीष कारेमोरे, सामाजिक कार्यकर्ते राकेश काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता दिनेश घोडे , ग्रामपंचायत सदस्य मयूर गणेर, रस्ता बांधकाम ठेकेदार कंपनीचे ठेकेदार बुधवानी यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. .
रनाळा मोक्षधाम ते अलंकार नगरपर्यंत नाला बांधण्यात येणार आहे
पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांनाच त्रास होत नाही, तर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनाही पावसाच्या पाण्यामुळे त्रास होत होता. अशा स्थितीत रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळताच भूमिपूजन करून काम सुरू करण्याची माहिती सरपंच साबळे यांनी दिली. याशिवाय पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये यासाठी रनाळा मोक्षधाम ते अलंकार नगरपर्यंत रस्त्याच्या कडेला मोठी नाली बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. रस्ते आणि नाल्यांच्या बांधकामामुळे लोकांना विशेषतः वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशी माहितीही साबळे यांनी दिली. रस्ता मंजूर झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सरपंच साबळे यांचे आभार मानले, तर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच साबळे यांनी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार बावनकुळे व आमदार सावरकर यांचे विशेष आभार मानले.