– रॅगिंग विषयावर जनजागृती शिबिर
यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पी. वाधवाणी कॅालेज ऑफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने रॅंगिंग या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रॅगिंग समाजासाठी धोकादायक असल्याचे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले जिल्हा न्यायाधीश- 1 व्ही.बी.कुलकर्णी यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या.कुलकर्णी यांच्यासह दिवाणी न्यायाधीश व.स्तर तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए.नहार, वाधवाणी कॅालेजचे प्राचार्य डॅा.अनिल चांदेवार उपस्थित होते.
एखाद्या मुला-मुलींकडून दुसऱ्या मुलांसमोर अपमानास्पद वागणूक देणे, छळ करणे, त्यांच्या मनाविरूध्द कृत्य करण्यास भाग पाडणे, दहशतीचे वातावरण निर्माण करणे, अमानवीय गैरप्रकार करून घेणे, अशी कृती करणे ज्यामुळे मुलांमध्ये मानसिक दडपण येईल, अशा बाबी रॅगिंगमध्ये येतात. याबाबत सविस्तर माहिती न्या.व्ही.बी. कुलकर्णी यांनी यावेळी दिली. रॅंगिंग होत असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये असलेल्या अँन्टी रॅंगिंग स्कॅाडकडे तक्रार द्यावी. तक्रारीनंतर सदर स्कॅाडला 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करावा लागतो याबाबत त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे वक्ते सचिव के.ए. नहार यांनी रॅंगिंग कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मुला-मुलींना 2 वर्ष कारावास व दंडाची शिक्षा असल्याचे यावेळी सांगितले. रॅंगिंग करणारे विद्यार्थी आढळल्यास 5 वर्षापर्यंत कुठल्याही संस्थेत त्याला प्रवेश मिळत नाही, महाविद्यालयातून सुध्दा काढल्या जाते. सर्व महाविद्यालयांमध्ये अँन्टी रॅंगिंग कमिटी स्थापन असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
रॅंगिंग संबंधात काही अडचण असल्यास टोल फ्री क्रमांक 18001805522 वर संपर्क करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॅा.अनिल चांदेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा.मैमुन बॅाम्बेवाला यांनी केले तर आभार प्रा.शिल्पा गावंडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.