संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– स्वामी अवधेशानंद शाळेतील विद्यार्थिनींचा स्तुत उपक्रम
कामठी :- भाऊ-बहिणीच्यानात्याला आणखी घट्ट करणारा राखीपौर्णिमा हा सण. या सणाच्या दिवशी प्रत्येक घरातच धामधूम पाहायला मिळते. मात्र, दुर्दैवाने ज्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आलेली आहे, त्या चिमुकल्यांनी हा सण कसा साजरा करावा? काही अनाथ मुलांना तर रक्षाबंधन म्हणजे काय असते हे देखील माहीत नसते. अशावेळी आपले दायित्व म्हणून कामठी येथील स्वामी अवधेशानंद शाळेच्या प्राचार्या ईशा मुदलियार यांनी पुढाकार घेऊन शाळेच्या विद्यार्थिनीं कडून बाल सदन अनाथालय येथील चिमुकल्यांसोबत रक्षाबंधन सण आज मंगळवार ला साजरा केला.
भावाच्या हातावर प्रेमाने राखी बांधून त्याच्या सुखाची कामना करणारी बहीण प्रत्येक भावालाच हवी असते. पण, स्त्रीभ्रूण हत्येमुळे काही बहिणी हरवल्या तर काहींना अनाथ आश्रमांचे छत्र मिळाले. या नकोशीप्रमाणेच काही मुलांवर अनाथ आश्रमात राहण्याची वेळ आली आहे. या मुलांनादेखील एक नागरिक म्हणून जगण्याचा हक्क आहे. आपले सण, संस्कृती त्यांनी समजावी शिवाय यातून सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने स्वामी अवधेशानंद शाळेच्या प्राचार्या डॉ. ईशा मुदलीयार यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या विद्यार्थिनींनी हा सण अनाथ मुलांसह मोठ्या उत्साहाने साजरा केला. ही संस्था दरवर्षी नियमित या चिमुकल्यांसोबत सण साजरा करते आणि वेगवेगळ्या उपक्रमातून या चिमुकल्यांबरोबर उत्सवाची मजा लुटते. यात ते चिमुकल्यांना राखी बांधण्यासह काही सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांच्या कौशल्याच्या, त्यांच्यातील कलेचा विकास साधतात. यंदादेखील त्यांनी चिमुकल्यांसह रक्षाबंधन साजरा केला. जवळपास 20 विद्यार्थिनींनी या 24 अनाथ मुलांना राख्या बांधल्या आणि या चिमुकल्यांना शालेय साहित्यांसह फळं, गोड पदार्थ भेट दिले.
यावेळी ज्योती आष्टीकर, रंजना नारनवरे, शाळेच्या कर्मचारी विशाखा, सुनीता, बाल सदन अनाथालय येथील नम्रता बागडे, कविता रथकांठीवर, माधुरी गडपायले व शाळेतील इतर कर्मचारी उपस्थित होते.