नागपूर :- सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये राखी तयार करून सैन्यांना पाठविणे हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षापासून घेतला जातो. सैनिक हा देशाचा कणा आहे. ज्या देशाची सैनिक मिलिटरी व्यवस्था समृद्ध असते तो देश अग्रेसर असतो हाच उद्देश समोर ठेवून प्रहाराने मिलिटरी शिक्षणात पुढाकार घेतला आहे. सैनिक सीमेवर रात्रंदिवस कठीण परिस्थितीचा सामना करतो त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे व सर्व भारतीय बांधवांच्या प्रेमाचा दिलासा देणे या उद्देशाने प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये राखी अर्पण समारंभ घेण्यात येतो.या वर्षी दि. 5 ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेण्यात आला. प्रहार च्या शिस्तबद्ध बँड पथकाने प्रमुख अतिथींचे स्वागत केले. भारत माता पूजन व प्रमुख अतिथींच्या सत्कारानंतर कार्यक्रम सुरू झाला. लष्करी शिस्तीत अमर जवान ला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी एका देशभक्तीपर गीताचे गायन प्रस्तुत तसेच देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी सी.पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित येणाऱ्या आणि इतरही विविध शाळांनी तयार केलेल्या राख्या ॲड. अशोक बनसोड अध्यक्ष, विजय काकभट (सचिव), यांनी लेफ्टनंट कर्नल चेतन आनंद कामठी, यांच्या स्वाधीन केल्या जेणेकरून रक्षाबंधन पर्यंत त्या राख्या सीमेवरील सैन्यात पोहोचतील व त्यांच्या खडतर कार्याविषयी अभिमान कृतज्ञता व सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचेल. प्रहारच्या राखी अर्पण कार्यक्रमात अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रहारच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. प्रहारची शिस्त , कार्यक्रमाचे व्यवस्थापन कौशल्य, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि देशप्रेम जबाबदारीची जाणीव यांनी ते प्रभावित झाले.
या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या. सी.पी अँड बेरार च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्रमुख, प्राचार्य , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रहारच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेच्या शिक्षिका मृणाल काटे यांनी केले. या कार्यक्रमात नागपुरातील सगळ्या शाळांनी एकूण जवळपास पन्नास हजार राख्या पाठवून सक्रिय सहभाग घेतला.
श्री मंगल बहुदेशीय शिक्षण संस्था मुकबधीर निवासी शाळा, सावनेर, ज्ञानोदय आयएएस ॲकॅडमी नागपूर, राजेंद्र हायस्कूल, कोठी रोड महाल, नागपूर, सरस्वती विद्यालय शंकर नगर, नागपूर, दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा नागपूर. राही पब्लिक ग्रुप स्कूल, जयताळा, कुर्वेज न्यू मॉडर्न स्कूल, नागपूर. भिडे गर्ल्स हायस्कूल ,जीएच रायसोनी कॉलेज, राजेंद्र हायस्कूल, नंदनवन, संपूर्ण बांबू केंद्र, सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ, गायत्री कॉन्व्हेंट महाल, वसंतराव नाईक शासकीय संस्था, गायत्री कॉन्व्हेंट हुडकेश्वर, ज्ञानदीप शाळा, जयताळा, नागपूर , लोकांची शाळा, रेशीमबाग, नागपूर, रोटरी क्लब नागपूर एलिट, केशव नगर माध्यमिक विद्यालय व कनिष्ट विद्यान महाविदयालय, नंदनवन, नागपूर, कै.दौलतराव ढवळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नरसाळा, अण्णासाहेब गोखले विद्या मंदिर, रवि नगर, बापूसाहेब काकभट शाळा, महाल, सी.पी अँड बेरार हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय महाल, सी.पी अँड बेरार प्राथमिक शाळा, सिरसपेठ नागपूर, सी.पी अँड बेरार कॉलेज, तुळशीबाग, नागपूर, सी.पी.अँड बेरार हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, रवी नगर, प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर, नागपूर यांनी सहभाग घेतला होता.