– शिवसेनेने दिला दोन दिवसांचा अल्टिमेटम
यवतमाळ :- शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची चाहूल लागली असताना जिल्ह्यातील ६० टक्के शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित आहेत. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण होवूनही पीक कर्ज न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्याची दखल घेत सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ वाटप करण्याची मागणी केली. दोन दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असलेल्या ५० हजार शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज वाटप करण्यात आले नाही, असा आरोप यावेळी लिंगनवार यांनी केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे ६० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळालेले नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास ७०० कोटी रूपयांच्या कर्जाचा भरणा केला आहे. मात्र कर्जाची नियमित पतरफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज दिले जात नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे हरिहर लिंगनवार यांनी म्हटले आहे. बँकेच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागत असल्याने याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बँकेने येत्या दोन, तीन दिवसांत शिल्लक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, अशी मागणी शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तत्काळ कर्ज वाटप न केल्यास मध्यवर्ती बँकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर, राजुदास जाधव, भाऊराव ढवळे, राजकुमार वानखडे, उत्तमराव ठवकार, मनोज सिंगी आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
तर उद्भवणाऱ्या परिस्थितीस बँका व प्रशासन जबाबदार राहील
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन देवून, जिल्हा बँकेला पीक कर्ज वाटप तत्काळ सुरू करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी केली. येत्या दोन दिवसांत शिल्लक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थतीस बँका व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनास दिला.