महाराष्ट्राच्या विकासासाठी ,देशाच्या सुरक्षिततेसाठी महायुतीला विजयी करा – सांगली येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आवाहन

सांगली :- महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केले. सांगली येथे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी झालेल्या विराट सभेत शाह बोलत होते. कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यावेळी उपस्थित होते. नागपूरमध्ये संविधान म्हणून कोऱ्या पानांचे पुस्तक दाखवून राहुल गांधींनी संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा घणाघातही शाह यांनी केला .

शाह म्हणाले की, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला तुष्टीकरणाचे राजकारण करत जातीजातींमध्ये विभाजन करून देशाला कमकुवत बनवायचे आहे. मोदीजींनी काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे विधेयक आणल्यानंतर राहुल गांधी, शरद पवार,ममता बॅनर्जी,स्टॅलिन, अखिलेश यादव या सर्वांनी विरोध करत असे केल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील अशी भाषा केली होती. मात्र मोदींजींच्या कार्यकाळात तिथे रक्ताचा एकही थेंब सांडला नाही की एकही दगड दगडफेकीसाठी उठला नाही. ही मोदीची ताकद आहे. राहुल गांधी यांच्या चार पिढ्यादेखील जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणू शकणार नाहीत. युपीएच्या काळात सोनिया मनमोहन सिंग सरकारमध्ये पाकिस्तानकडून बॉम्बस्फोट घडत होते. मात्र मोदीच्या कार्यकाळात उरी,पुलवामा हल्ल्याला पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राइक करत चोख प्रत्युत्तर मोदी सरकारने दिले होते याची आठवण शाह यांनी करून दिली.

मोदीनी देशाला सुरक्षित केले आणि धर्म व संस्कृतीचा सन्मान केला. अयोध्येतील राम मंदिराला कॉंग्रेस 75 वर्षे आडकाठी करत होते मात्र मोदी सरकारने राममंदिर निर्माण करून दाखवले. भाजपासाठी संविधान हा प्रचाराचा मुद्दा नाही, तर विश्वासाचा मुद्दा आहे. .मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आणि आत्ता विधानसभा निवडणुकीत विरोधक संविधानाच्या मुद्द्यावर मते मागत आहेत ,जनतेची दिशाभूल करत आहेत. नागपूरमध्ये राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन दाखवली त्यावरूनही शाह यांनी राहुल यांचा समाचार घेतला. राहुल गांधी ज्या लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात त्या लाल पुस्तकात फक्त कोरी पाने आहेत, ते संविधान नाही. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अपमान आहे. मोदी सरकार आहे तोपर्यंत संविधानाला हात लावायची आणि आरक्षणाला धक्का लावायची कुणामध्ये हिंमत नाही. आरक्षण जैसे थे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली .

सांगली परिसराच्या विकासासाठी काम सुरू असून पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे विद्य़ुतीकरणाचे काम पूर्ण झाले, पुणे- कोल्हापूर – मिरज-हुबळी वंदे भारत सुरु झाली आहे, असेही शाह यांनी नमूद केले. शरद पवारांमुळे 200 सहकारी साखर कारखान्यांची संख्या रोडावत 101 वर पोहोचली असा आरोप केला. मोदी सरकारने सहकारी साखर कारखान्यांचा आयकर माफ करत साखर उत्पादक शेतक-यांना दिलासा दिला. महायुती सरकारमुळे मागच्या सव्वादोन वर्षात परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे.प्रत्येक चांगल्या प्रकल्पात खोडा घालण्याचे काम महाविकास आघाडीने केले. अशा विकासविरोधी महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानातून चोख उत्तर द्या असे आवाहन शाह यांनी मतदारांना केले.

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत शाह म्हणाले की सत्तेच्या लालसेपायी इतक्या खालच्या स्तराला जाऊ नका. संभाजीनगर नामकरणाला, राममंदिर निर्माणाला, ट्रिपल तलाक रद्द करण्याला, काश्मीर वाचवण्याला विरोध करणा-या मंडळींसोबत आघाडी करून ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेला मूठमाती दिली अशी सडकून टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींनी वक्फ बोर्ड कायदा बदलण्यासाठी विधेयक आणले त्याला विरोधक मुद्दाम विरोध करत आहेत. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस सरकारच्या राज्यात कर्नाटकच्या वक्फ बोर्डाने मंदिर आणि शेतकऱ्यांच्या जमिनीसह संपूर्ण गाव वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केले आहे. कोणीही कितीही विरोध केला तरी मोदी सरकार वक्फ कायदा सुधारणा करणारच अशी ग्वाही शाह यांनी दिली. महायुतीचे सरकार पुन्हा निवडून द्या मग किसान सन्मान निधी 12 हजारांवरून 15 हजार करण्यात येईल असा शब्द त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राला विश्वास आहे. त्यामुळे सांगलीत पुन्हा कमळ फुलणार आहे, असा विश्वासही श्री. शाह यांनी व्यक्त केला. सांगलीकरांसाठी एक खुशखबर आहे असे म्हणत शाह यांनी सांगलीत लवकरच नवीन विमानतळ होणार असल्याचे सुतोवाच केले. हळद उत्पादक शेतक-यांसाठी मोदी सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली. या हळद मंडळाचे केंद्र सांगलीत सुरु होणार असल्याचेही शाह यांनी सांगितले .

शुक्रवारी शाह यांच्या शिराळा चे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सत्यजित देशमुख , इस्लामपूर चे उमेदवार निशिकांत पाटील, कराड दक्षिण चे उमेदवार अतुल भोसले आणि इचलकरंजी चे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारासाठी देखील सभा झाल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकशाहीच्या उत्सवाची गृहमतदानाने सुरूवात

Sat Nov 9 , 2024
– अहेरी विधानसभा मतदारसंघात नोंदणीकृत वयोवृद्ध आणि दीव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 85 वर्षावरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानाने जिल्ह्यात आजपासून लोकशाहीच्या उत्सावाला सुरूवात झाली आहे. अहेरी मतदार संघात गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या सर्व 38 मतदारांनी आज मतदान केले. अहेरी विधानसभा मतदारसंघातील सिरोंचा येथील किष्तय्या कोम्ममेरा, वर्धना मोदूत, चंद्रय्या बोंताला, अहेरीलतील जैयबुनिशा शेख, मुनिर मो. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!