बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा, मोदी यांच्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या! – गोंदियातील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आवाहन

गोंदिया :- एकीकडे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र आलेले इंडिया आघाडीचे नेते यातून योग्य निवड करून देशाच्या विकासाची गंगा नव्या वेगाने वाहती राखण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदी बसवू या, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी गोंदिया येथील जाहीर सभेत बोलताना केले. ज्यांचे अनेक नेते जेलमध्ये, आणि अनेकजण बेलवर आहेत, अशा भ्रष्टाचाऱ्यांच्या आघाडीला कायमचे घरी बसवा, असेही ते म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा – गोंदिया चे उमेदवार सुनील मेंढे आदी यावेळी उपस्थित होते.

लोकसभेची ही निवडणूक केवळ एका खासदारास विजयी करण्याची निवडणूक नसून दोन विचारधारांची लढाई आहे. विकासाची राजनीती, देशाच्या उज्जवल भविष्याचा संकल्प आणि देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांना शिव्याशाप देणे, मोदींना सत्तेवरून हटविणे आणि विकासाला विरोध करत भ्रष्टाचाराची पाठराखण करणे एवढाच घमंडी आघाडीचा अजेंडा आहे, असा स्पष्ट आरोप करीत नड्डा यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराचा तपशीलवार पाढाच या सभेत वाचला.

मोदी सरकारने देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला असून याआधी केवळ उच्चनीच, शहरी-ग्रामीण, आणि जातीधर्माच्या नावाने होणाऱ्या राजकारणास हद्दपार केले. मोदी यांनी राजकारणाची परिभाषाच बदलून टाकली असून आता विकासाचे राजकारण केंद्रस्थानी आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर व सबका साथ सबका विकास, सबका प्रयास या नीतीने देशाच्या राजनीतीला नवी दिशा मिळाली आहे.

गाव, गरीब, वंचित, पीडित, शोषित, दलित, युवा, किसान, महिला यांची जेथे काळजी घेतली जाते, तेथे विकास, समृद्धी आणि उत्कर्ष साधला जातो. मोदीजींच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात गावागावात पक्के रस्ते झाले, वीज पोहोचली. देशातील अडीच कोटी घरे मोदी यांच्या सौभाग्य योजनेमुळे विजेने उजळली, आज देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळते. 25 कोटी लोकसंख्या गरीबीतून मुक्त झाली, ही भारताची समृद्धी आहे. काँग्रेसच्या काळात गरीब महिलांना जळणासाठी लाकडे गोळा करण्याकरिता पायपीट करावी लागायची, चुलीच्या धूरात गुदमरण्याची वेळ यायची, आज दहा कोटी भगिनींना उज्ज्वला योजनेतून गॅस जोडण्या देऊन मोदी यांनी भगिनींची या त्रासातून मुक्तता केली आहे.

2014 पूर्वीच्या भारतात, ग्रामीण भागांतील महिलांना सूर्योदयापूर्वी आणि रात्री, नैसर्गिक विधींसाठी घराबाहेर जावे लागायचे. महिलांची प्रतिष्ठा पणाला लावणारे हे लाजीरवाणे प्रकार बंद करण्यासाठी मोदीनी घरोघरी स्वच्छतागृहे दिली आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला, असे ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेतून पाच लाखांचे विमा कवच देऊन मोदी यांनी 55 कोटी लोकांच्या आयुष्याला सुरक्षितता दिली. महामार्ग, रेल्वे, विमानसेवांचे जाळे या देशाच्या प्रगतीच्या पाऊलखुणा आज सर्वत्र उमटल्या असून मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर येत्या पाच वर्षांत देशातील सर्व रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची होऊन देशाचा संपूर्ण कायापालट झालेला दिसेल, अशी ग्वाही देखील नड्डा यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज हे मोदींचे स्वप्न आहे. विकासाची ही गंगा अशीच निरंतर राहावी, यासाठी मोदी सरकारला पुन्हा सत्ता द्या, कारण मोदी आणि विकास ही अविभाज्य अंगे आहेत. जिथे मोदी तिथे विकास हे समीकरण झाले आहे. एकीकडे भ्रष्टाचार हटाओ म्हणणारे मोदी, आणि भ्रष्टाचारियो को बचाओ म्हणत एकत्र आलेले इंडी आघाडीतील पक्ष, यातून भ्रष्टाचार हटविणाऱ्यास निवडायचे, कि भ्रष्टाचाऱ्यांना निवडायचे, याचा निर्णय करण्याची वेळ आली आहे, असे सांगत नड्डा यांनी इंडी आघाडीच्या नेत्यांवरील घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संपूर्ण पाढा वाचला. राहुल गांधी, सोनिया गांधी, पी.चिदम्बरम, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, तसेच अनेक द्रमुक नेते, तृणमूलचे नेते जामिनावर (बेल) बाहेर आहेत, तर अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, डीएमके मंत्री जेलमध्ये आहेत. ज्यांचे अर्धे नेते बेलवर आणि अर्धे नेते जेलमध्ये, अशा भ्रष्ट आघाडीला घरी बसवा, असे आवाहन त्यांनी भाषणाच्या अखेरीस केले.

ग्यान ही विकासाची परिभाषा!

मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे, सर्व समाजघटकांच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. सर्व समाजातील सर्व स्तरांच्या उत्कर्षाची राजनीती देशात सुरू झाली असून, ग्यान हे विकासाचे सूत्र बनले आहे. ग्यान या शब्दातील जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे युवा, ए म्हणजे अन्नदाता व एन म्हणजे नारीशक्ती, ही मोदींच्या राजनीतीची चतु:सूत्री आहे, असे नड्डा म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माळी समाजाचा मेळावा व गुरु शिष्य जयंती उत्सवाचे आयोजन रविवारी

Sat Apr 13 , 2024
नागपूर :- सकल माळी समाजा तर्फे माळी समाजात ज्यांनी जन्म घेतला असे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी गोरगरीबांच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. असे गुरुशिष्य जयंती सोहळ्याचे आयोजन दि. १४ एप्रिल २०२४ ला आयोजन करण्यात आले आहे. सावता लॉन, शाहू नगर, मानेवाडा रोड, नागपूर येथे सायंकाळी ६.०० वाजता. सकल माळी समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहावे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com