– ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजने’चा थाटात शुभारंभ
नागपूर :- वर्षानुवर्ष गावगाड्याचे अर्थव्यवस्था सांभाळणारे बारा बलुतेदार कामगारांनी बदलत्या काळात पुढे राहण्यासाठी आपल्या पारंपरिक व्यवसायात नवीन कौशल्य आत्मसात करून आधुनिकतेची कास धरावी या हेतूने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना’ सुरु केली आहे. कामगारांच्या विकासातून अर्थव्यवस्था वाढीचे उद्दिष्ट साध्य होणार असून कामगार व कारागीर यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील कारागीर आणि कामगारांसाठी आज ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना’ शुभारंभाचा मुख्य कार्यक्रम दिल्ली येथे झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी आमदार कृष्णा खोपर्डे, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मध्यम व लघुउद्योग प्रकाश विभागाचे संचालक प्रशांत पार्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात लोहार, सुतार, सोनार, मुर्तीकार, चर्मकार, गवंडी, शिंपी आदी 18 विविध प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना काळानुरूप आधुनिक प्रशिक्षण देवून त्यांचे कौशल्य विकसित करण्यात येणार आहे. यासोबतच कारागीरांसाठी आवश्यक व्यवसायीक साहित्य (टूलकिट) व व्यवसाय उभारण्यासाठी विनातारण तीन लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमुळे पारंपारिक व्यावसायिकाचे पुनरुज्जीवन होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. असे प्रतिपादन फडणीस यांनी यावेळी केले.
प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास योजनेमुळे आपण जगात पाचवी सर्वात मोठे अर्थव्यवस्था म्हणून समोर आलो, आता पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये कामगारांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यानी स्पष्ट केले
केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले की काळाच्या ओघात मागे पडलेल्या बारा बलुतेदारांना या योजनेच्या माध्यमातून योग्य प्रशिक्षण मिळाल्यास सर्व समाजाची अधिक वेगाने प्रगती होऊन हे बारा बलुतेदार नवीन विश्व निर्माण करतील. विदर्भात रोजगार कौशल्य विकास यूनिवर्सिटी स्थापनेची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुखी, समृद्ध समाज हे चित्र यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणूका देशकर यांनी केले. कार्यक्रमाला केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.