नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेबाबत शुक्रवारी (ता.१३) शहरातील विविध भागात अतिरिक्त आयुक्त राम जोशी व स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर आणि नागपूर@२०२५ च्या सदस्या किरण मुंधडा यांनी जनजागृती केली.सतरंजीपुरा झोनमधील तांडापेठ परिसरात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांन नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना स्पर्धेबाबत माहिती दिली. यावेळी झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, नागपूर@२०२५चे मल्हार देशपांडे उपस्थित होते. तर लकडगंज झोनमधील डॉ. आंबेडकर उद्यानात शहर स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर आणि नागपूर@२०२५ च्या सदस्या किरण मुंधडा यांनी सकाळी उद्यानात नागरिकांशी संवाद साधून त्यांना स्पर्धेबाबत माहिती दिली. यावेळी झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, स्वच्छता अधिकारी आत्राम यांच्यासह नागपूर स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या तेजस्विनी महिला मंचच्या महिला सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.दोन्ही उपस्थित नागरिकांनी स्वच्छतेबाबत आपल्या समस्या मांडल्या. प्रत्येक समस्यांचे विवेचन करीत त्या समस्या सोडविताना जनसहभाग कसे उपयुक्त ठरू शकते हे पटवून देताना श्रीमती मुंधडा यांनी स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे महत्व अधोरेखित केले. तर अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी प्रशासनीक स्तरावर शहराच्या स्वच्छतेसाठी सुरू असलेली कार्यवाहीची माहिती देताना शहर स्वच्छतेत प्रत्येक नागरिकाची भूमिका विषद केली. आपले शहर स्वच्छ, सुंदर दिसावे ही प्रत्येकाची भावना असून ते स्वच्छ आणि सुंदर राखले जावे ही प्रत्येकाची जबाबदारी असून यादृष्टीने कार्य करण्यासाठी स्वच्छ मोहल्ला स्पर्धा असल्याचे त्यांनी नागरिकांना पटवून दिले.
आपल्या परिसराच्या स्वच्छतसोबतच परिसरात विकास कामे करण्यासाठी महत्वाची स्पर्धा असून यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होउन जबाबदारीने शहराप्रति कर्तव्याचे निर्वहन करण्याचे आवाहन यावेळी राम जोशी यांनी केले.