सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची असल्याचा अभिमान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

– चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

– पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवाना

चंद्रपूर :- अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे मंदीर, लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद झालेले भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. तो म्हणजे या सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. यात आणखी एक मानाचा तुरा आज (दि. 10) रोवला गेला. भारतातील सर्व नागरिकांना न्याय देणारी सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची राहणार आहे, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

बल्लारपूर येथे महाराष्ट्र वनविकास महामंडळातर्फे देशाचे पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवानगी करतांना वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, भाजपा शहर अध्यक्ष,काशिनाथ सिंह,प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, पियुषा जगताप, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी किशोर जैन, सहायक व्यवस्थापक गणेश मोटकर आदी उपस्थित होते.

आजचा हा कार्यक्रम अतिशय वैशिष्टपूर्ण आहे, असा उल्लेख करून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी बल्लारपूर येथून काष्ठ पाठवित आहोत, हा चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर आणि वनविभागासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणा-या खुर्चीवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गौरव, विकास आणि प्रगतीचे उच्चांक गाठणार आहे, यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. यापूर्वी एफडीसीएम ने अयोध्येचे राम मंदीर, लोकशाहीचे मंदीर नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद पार पडलेले ठिकाण भारत मंडपम आदींसाठी काष्ठ पाठविले आहे. या इमारतींचा प्रत्येक दरवाचा आपल्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

शांती, प्रेम, सद्भावना, सहकार्य यासोबतच चिमूर क्रांतीचा आणि वाघांची भुमी असलेला चंद्रपूर जिल्हा आहे. या वाघाच्या भुमीतून पंतप्रधान कार्यालयासाठी 3018 घन फूट लाकूड दिल्लीला जात आहे. यापूर्वीसुध्दा भारत – चीन युध्दात या जिल्ह्याचे सुपूत्र तत्कालीन मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार सह्याद्रीच्या मदतीला धावून गेले. पंडीत नेहरुंच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारत – चीन युध्दात सर्वाधिक सुवर्णदान चंद्रपूर जिल्ह्यानेच दिले. अशा विरतेचे, शुरतेचे आणि पराक्रमाचे प्रतिक असलेले काष्ठ बल्लारपूर येथून जात आहे.

पुढे वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, देशात 1942 मध्ये ‘चलेजाव’ ची पहिली ठिणगी चिमूरमध्ये पडली. क्रांतीची मशाल पेटविणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणा-या खुर्चीवर बसून ‘चलेजाव आतंकवाद, चलेजाव नक्षलवाद, चलेजाव जातीयवाद’ असा नारा देऊन प्रत्येक गरीबाची चिंता, त्यांच्या कल्याणाचा मार्ग या खुर्चीत बसून पंतप्रधान शोधतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केवळ पंतप्रधानांचे कार्यालयच नव्हे तर केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीचे सभागृह, विविध देशांसोबत जेथे करार केले जातात तेथील खुर्च्या आणि संपूर्ण फर्निचर बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणार आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तयार करण्यात आलेला 7 फुटांचा तिरंगा ध्वज आजही पंतप्रधान कार्यालयात डौलाने उभा आहे, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांनी केले. संचालक प्रज्ञा जीवनकर आणि कल्पना चिंचखेडे यांनी तर आभार सहायक व्यवस्थापक गणेश मोटकर यांनी मानले.

या कार्यालयात होणार बल्लारपूरच्या सागवान काष्ठचा वापर

पंतप्रधान कार्यालय, संमेलन कक्ष, द्विपक्षीय चर्चा कक्ष, कॅबीनेट सभा कक्ष, पंतप्रधान यांचे प्रधान सचिव यांचे कार्यालय.

आतापर्यंत सागवान काष्ठ पुरविण्यात आलेले नामांकित प्रकल्प

अयोध्या येथील श्रीराम मंदीर, नवीन संसद भवन, उपराष्ट्रपती भवन, भारत मंडपम, केंद्रीय सचिवालय, सातारा सैनिक शाळा, दादरा नगर हवेली वनविभाग, नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील स्टेटीयम, नाशिक येथील मध्यवर्ती कारागृह.

वनविभाग व एफडीसीएमचे विशेष कौतुक

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र (एमडीसीएम) चा थेट संबंध रोजगाराशी येतो. त्यासाठीच तडाळी येथे 10 एकर जागेवर रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षणाचे केंद्र उभे राहत आहे. एफडीसीएम ने नुकताच गत चार वर्षातील सर्वाधीक 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. वनविभागात काम करणारा प्रत्येक वनरक्षक, वनमजूर, एफडीसीएमचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी विशेष कौतुकास पात्र आहे.

बांबुच्या धाग्यासाठी ससमिरा कंपनीसोबत करार

सर्वोत्तम कपडे बांबुच्या धाग्यापासून तयार होतात. याची जगभरात मागणी वाढत आहे. त्यामुळेच 29 कोटी रुपयांचा पहिला प्रकल्प चंद्रपुरात साकारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारच्या ससमिरा कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. या माध्यमातून बल्लारपूर, चंद्रपूरचे नाव जगात जाईल, अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा आयुक्तांनी साधला क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद

Wed Sep 11 , 2024
– ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’चा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ पोहोचविण्याचे आवाहन नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा व विविध खेळांच्या खेळाडूंना लाभ मिळावा या हेतूने मनपामध्ये शहरातील सर्व क्रीडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!