यवतमाळ :- निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्ष, उमेदवारांकडून वाहनांवर प्रचाराचे झेंडे, फलक लावले जातील, असे झेंडे, फलक लावण्याबाबत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सूचना जारी केल्या आहे.
जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे फिरत्या वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, ईतर कोणत्याही बाजूने तो लावता येणार नाही.
फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर दि.6 जूनपर्यंत लावता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.