प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद

– आत्मनिर्भर महिला स्वत:सोबत समाजाचेही कल्याण करतात – प्रधानमंत्री

-विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्यातील विविध जिल्ह्यात राज्य व केंद्रीय मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :- आपल्या देशातील आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार आणि समाजाचेही कल्याण करतात आणि अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रधानमंत्री यांनी मुंबईतील कांदिवली येथे राहणाऱ्या मेघना गुरव यांच्याशी संवाद साधत त्यांची माहिती घेतली. विविध योजनांमुळे मेघना यांच्यासह त्यांच्या बचतगटातील इतर स्त्रियांच्याही आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडल्याचे त्यातून उलगडत गेले. पूर्वी पदपथावर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या मेघना यांना मुद्रा योजनेतून कॅनरा बँकेमार्फत मिळालेल्या 90 हजार रुपयांच्या कर्जाने, त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आवश्यक ती सामग्री विकत घेऊन त्यांनी एकटीच्या हिंमतीवर व्यवसायाचा पसारा वाढवला. त्यानंतर मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाच्या मदतीने त्यांच्या मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवता आल्यामुळे एक ‘एकल माता’ म्हणून त्यांना विशेष समाधान झाले, असे मेघना यांनी यावेळी सांगितले. मेघना यांनी पीएम स्वनिधी योजनेतून कर्जाची उचल केली. योजनेची सुयोग्य माहिती त्यांना प्राप्त झालेली असल्याने हप्ते वेळेवर भरणाऱ्यास पुढे कमी दराने मिळणाऱ्या अधिक कर्जाची माहिती त्यांना आहे, व व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने त्यांनी तशा अधिक कर्जाची उचल करण्याचे नियोजनही केले आहे.

मेघना यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या मदतीने स्वतःचा संसार सावरण्याबरोबरच बचत गटातील 25 भगिनींना काम दिले. पीएम कौशल्य विकास योजनेद्वारे या स्त्रियांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले व आता त्या जोरावर त्यांना ठिकठिकाणची शिवणाची कामे तर मिळतातच, पण त्यांनी केलेल्या रजया परदेशातही जातात, हे ऐकून प्रधानमंत्री यांनी त्यांची विशेष प्रशंसा केली.

या दृकश्राव्य संवाद कार्यक्रमासाठी मुंबईत मालाडमध्ये जनकल्याण नगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री योगेश सागर, राजहंस सिंह, सुनील राणे, महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रपुर येथे आयोजित अशाच कार्यक्रमात केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांबरोबर होणाऱ्या संवादात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की मे 2014 पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर सर्वांसाठी घरे, एलपीजी कनेक्शन, नळ जोडणी यात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. लखपती दीदी या माध्यमातून शिवणकाम, प्लम्बिंग तसेच तत्सम उद्योगातून महिलांना लखपती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे अनेक महिला आता आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. ड्रोन दीदी माध्यमातून ड्रोनचे प्रशिक्षण देऊन महिलांना कृषी क्षेत्रात ड्रोन वापराने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे पुरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील पेठ येथील भारत संकल्प रथयात्रेत भेट देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच मिळालेला लाभ याबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांचे समवेत चिखलीच्या आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या.

छत्रपती संभाजीनगर शहरातील मोहाटादेवी चौक, बजाज नगर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. आरोग्य आणि बाकीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मंत्री डॉ. कराड म्हणाले. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांनी जाणून घ्याव्यात, त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. सामान्यांच्या गरजांच्या पूर्तीसाठी ही यात्रा महत्वपूर्ण आहे, असे मत याप्रसंगी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. डॉ. कराड यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना आयुषमान भारत योजना कार्ड देण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या चिखली इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या या कार्यक्रमात लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरातील अनेक लाभार्थ्याशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव तालुक्यातील शिरूर येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी उपस्थित होते. भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठीच विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असून देशातील सामान्य नागरिकांचा विकास झाला तरच भारत जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येईल, असे मत पंकज चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबई दक्षिण मधील काँटनग्रीन परिसरातल्या शहीद भगतसिंग मैदानातही विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्यप्रणालीच्या माध्यतातून देशभरातल्या लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टाँल लावण्यात आले होते. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले.

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही, विकासाच्या प्रवाहात येता आले नाही, अशा लोकांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा, या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये 47 हजार 164 लाभार्थ्यांपैकी 23 हजार 668 पुरुष तर 22 हजार 845 स्त्रिया व 652 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते सनातन धर्माचे अमेरिकन अभ्यासक आनंद मॅथ्यूज यांच्या 'इन क्वेस्ट ऑफ गुरु', पुस्तकाचे प्रकाशन

Sun Dec 17 , 2023
– सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता – राज्यपाल रमेश बैस मुंबई :- व्यक्तिगत, सामाजिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे. परंतु, मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या व्यापक शिकवणीत आहे. सनातन धर्मातील या शिकवणीचे शास्त्रशुद्ध विवेचन करुन ते युवापिढीला सांगण्याचे काम अमेरिकन लेखक आनंद मॅथ्यूज शोकी करीत असून ते कार्य महत्वाचे आहे, असे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!