वीजबिलांच्या थकबाकीला चाप लावण्यासाठी प्री-पेड स्मार्ट मीटर

नागपूर :- वाढत्या थकबाकीवर उपाय म्हणून ‘जेवढे पैसे तेवढा टॉक टाइम’ या मोबाइल हिशेबाच्या धर्तीवर ‘जेवढे पैसे तेवढे युनीट वीज’ वापरण्याची सोय असलेल्या ‘प्री-पेड’ स्मार्ट वीज मीटर राज्यात सर्वत्र लवकरच मोफत लावण्यात येणार आहेत. मीटर नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड नाही. ग्राहकांना स्मार्ट मीटरचे विविध फायदे असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

वाढती थकबाकी आणि वीजगळती सोबतच वीजचोरीला चाप लावण्यासाठी डिश टीव्ही रिचार्ज आणि मोबाईल रिचार्जच्या धर्तीवर ही ‘प्री-पेड’ स्मार्ट वीज मीटर काम करणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व वीजग्राहकांकडे ‘प्री-पेड’ स्मार्ट वीज मीटर बसविले जाणार आहेत. प्री-पेड स्मार्ट मीटर घेणा-यांच्या बाबतीत मीटर रिडींग, बिल देणे, त्यांची वसुली करणे आणि बिल भरण्यास विलंब या गोष्टी टळणार असल्याने घरोघरी वसुलीची मोहीम राबवून आर्थिक स्थिती नियंत्रणात आणावयासाठी सध्या तारेवरची कसरत करीत असलेल्या महावितरणने सदैव थकबाकीच्या चक्रव्युहात अडकलेल्या वीज ग्राहकांना प्री-पेड स्मार्ट मीटरचा उतारा देत वाढत्या थकबाकीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात सर्वच राज्यांतील वीजग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये कृषिपंपांच्या वीजजोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2 कोटी 41लाख वीजग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. ग्राहकांना वीज वितरणची सेवा देणारी महावितरण ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी आहे. ना नफा, ना तोटा (रेव्हेन्यू न्यूट्रल) या तत्त्वाने वाटचाल असणाऱ्या महावितरणच्या सेवेचा केंद्रबिंदू हा फक्त आणि फक्त वीजग्राहकच आहे.

वीज बिलाच्या नियमित वसुलीसाठी राज्यभरात थकबाकी वसुली मोहीम तीव्रतेने राबविण्यात येत असून प्रत्येक कार्यालयातील एखाद दोन कर्मचारी वगळता कनिष्ठ कर्मचा-यांपासून वरिष्ठ अधिका-यापर्यंत सर्वजण वसुली मोहीमेवर असतात. याचा प्रत्यक्ष परिणाम महावितरणच्या दैंनंदिन कामावरही पडत असल्याने ग्राहक सेवा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामांवर त्याचा प्रतिकूल परिणामही जाणवत आहे.

या सर्व बाबींचा विचार करीत प्री-पेड स्मार्ट मीटरचा वापर करण्याचे महावितरणने ठरविले आहे. त्यामध्ये ग्राहकांकडून जेवढे पैसे भरले जातील तेवढीच वीज त्यांना मिळेल. पैसे संपल्यानंतर आपोआप वीजपुरवठा खंडित होईल, अशी व्यवस्था या मीटरमध्ये असणार आहे. त्यामुळे नियमित रिचार्ज करणा-या ग्राहकांना मुबलक प्रमाणात पुरेशी वीज उपलब्ध होणार आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीजवापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे. स्मार्ट मीटरमधील रिचार्ज संपल्यानंतरही रात्री सहा ते सकाळी 10 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार नाही. तसेच रिचार्ज संपल्यानंतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही. हॅप्पी अवर्स असल्यामुळे सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा रात्री-बेरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका नाही.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर ग्रामीण विशेष पथकाची कन्हान येथे जुगार अड्डयावर धाड

Wed May 29 , 2024
– पाच आरोपी अटक, एकुण ५,८८,५०५ रुपयां चा मुद्देमाल जप्त. कन्हान :- नगरपरिषद जुनी इमारत च्या बाजुला मच्छी मार्केट येथील साई लाॅट्री दुकाना समोर सार्वज निक रोडवर सुरु असलेल्या जुगार अड्यावर नागपुर ग्रामिण विशेष पथकांने धाड मारुन पाच आरोपी ला अटक करुन त्याचा जवळुन एकुण ५,८८,५०५ रुपयां चा मुद्देमाल जप्त केला आहे . सोमवार (दि.२७) मे ला सायंकाळी नागपुर ग्रामीण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com