नागपूर :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ दरम्यान होणार असून या परिक्षेसाठी २९ मे ते ९ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती, नागपूर विभागीय मंडळ कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ साठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने २९ मे ते ९ जून २०२३ पर्यंत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे.
१२ वी साठी पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहेत. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. तसेच विलंब शुल्कासहीत १० जून ते १४ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील, अशी माहिती नागपूर विभागीय मंडळ कार्यालयाने दिली आहे.
ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फ्रेबुवारी -मार्च २०२३ परीक्षेत अनुर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती भरता येईल. श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फ्रेबुवारी -मार्च २०२३ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै -ऑगस्ट २०२३ व फ्रेबुवारी -मार्च २०२४ अशा लगतच दोनच संधी उपलब्ध राहतील, असे नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव, चिंतामण वंजारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.