नागपूर :- लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून या प्रक्रियेत कोणीही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी शासन आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहे. मात्र राजकीय पक्षांनी देखील निवडणुकीच्या आधीच शासनाच्या मतदार नोंदणी अभियानात मदत करावी, असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभाग तथा मतदार यादी निरिक्षक विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रथमभेट नियोजनाअंतर्गत मान्यताप्राप्त राज्यकीय पक्षाची सभा घेतली. छत्रपती सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.
यावेळी बिदरी यांनी 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सांगितला. तसेच मतदान केंद्र अद्ययावत स्थिती, मतदान केंद्राचे सुस्थितीकरण, मतदान केंद्र निहाय बीएलए नियुक्त, नागपूर जिल्ह्यातील मतदाराची सद्यास्थिती, मतदार नोंदणी, वगळणी, स्थलांतर, मृत मतदारांच्या नावाचे निस्तारिकरण, नव मतदाराची नोंदणी या संदर्भातील चर्चा केली.
राजकीय पक्षांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून वरील निवडणूक कार्यातील त्रृटी लक्षात आणून द्यावी. प्रक्रियेतून कोणी वंचित राहणार नाही यासाठी संपर्कात असावे. शासनासोबत निवडणूक कार्यातील कमतरतेसाठी मदत करावी, असे आवाहन केले. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी नोंदणी अभियानाचे सादरीकरण केले.