भाजपा हा राजकीय पक्ष आहे. नोंदणीत तो स्वतंत्र व स्वायत्त आहे. संघाच्या प्रेरकतेतून तो निर्माण झालाय. ती तशी संलग्नता आहे. ती कागदात, ओळीत बांधलेली नाही. पण अतूट आहे. अभिन्न आहे. ते खरंय.
नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय बैठक झाली. ती अखिल भारतीय समन्वय बैठक होती. केरळ येथील पलक्कड येथे झाली. ३१ आगस्ट ते २ सप्टेंबर चालली. या बैठकीत संघाच्या संलग्न संघटना प्रमुखांनी भाग घेतला.
या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व संघटन सचिव बी एल संतोष हे आवर्जून हजर होते.
पलक्कड बैठकीत संघ संलग्न भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, विद्या भारती सहित ३२ संघटनांचे अध्यक्ष व संघटन मंत्री हजर होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे तीनपैकी दोन दिवस बैठकीत हजर राहीले.
बैठकीत जे ठरले ती माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख यांनी माध्यमांना दिल्ली येथे दिली. त्या माहितीचे वृत्तांकन करतांना टाईम्स ऑफ इंडियाने, Sunil Ambekar (प्रचारप्रमुख), who was the speaking to reporters in Kerala’s Palakkad after the conclusion of a three day co-ordination meeting of Sangha-affilates, including BJP, असे स्पष्ट लिहिले आहे.
Sangha-affilates हा शब्द वापरलाय.
परवाच्या केरळ बैठकीवरुन एक स्पष्ट झाले. काय ते ? ‘संघ भाजपत तंटा आहे. खूप बिनसले. सरकारप्रमुख नागपुरात येऊनही रेशीमबागेत जात नाहीत. सरसंघचालकांना वेळ देत नाहीत. दोन्हीत खूप फाटले .. ‘ वगैरे तेव्हढे खरे नाही. डावपेचही असू शकतील.
याशिवाय मार्गदाता कोण हे स्पष्ट झाले. शिवाय श्रेष्ठत्व कुणाकडे हेही स्पष्ट झाले.
जातीनिहाय जनगणना व्हायला हरकत नाही. मात्र, या माहितीचा उपयोग निवडणूक जिंकण्यासाठीचे राजकारण यासाठी होऊ नये असा सल्ला संघाने दिला. (never be treated as a ‘political tool’ to gain electorally).
भाजपबरोबर काही मतभेद आहेत. पण हा कौटुंबिक विषय असल्याने त्यावर तोडगा काढला जातो. आमच्या औपचारिक-अनौपचारिक बैठका हे सर्व प्रश्नांचे उत्तर असल्याचे माध्यमांशी बोलतांना प्रचारप्रमुख म्हणाले. याशिवाय एका प्रश्नाच्या उत्तरात, संलग्न घटकांशी विचारविनिमय करून आमचे अंतिमतः ठरते असेही त्यांनी सांगितले.
जातीनिहाय जनगणना करण्यास संघाची अनुकूलता लोकांपूढे आल्यानंतर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. धर्म, धर्मियांची बहुसंख्या याचे राजकारण कुणी केले ? ते राजकारण करून सत्ता कुणी प्राप्त केली ? आता तेच जातीनिहाय जनगणनेचे राजकारण करु नका असा सल्ला देतात. हा सूर मोठा दिसला.
याशिवाय, विचारविनिमय करून ठरते असे खुले सांगितल्याने भाजपची गोची झाली. भाजपने अद्याप जातिनिहाय जनगणनेवर अधिकृत भूमिका घेतलेली नाही. ‘पहा आणि शोध घ्या’ असे सुरुय. म्हणजे एकाच वेळी किती द्वंद्वता ?
जे घडले तो इतिहास असतो की जे सांगितले जाते तो ? वाद होईल. पण, घडले असे की, संघाने आधी जनसंघ हा राजकीय पक्ष काढला. तो ब्राह्मणांचा पक्ष या प्रतिमेतून बाहेर काढता आला नाही. ती संधी आणीबाणीने दिली. जनसंघ गुंडाळला गेला. भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली.
नाव बदलले. झेंडा बदलला. चिन्ह बदलले. आधी दिवा होता. त्याऐवजी कमळ आले.
प्रतिमाही बदलली. वाट मात्र, तीच आहे !
तरीही स्वतंत्रतेची, स्वायत्ततेची सांगासांगी सुरुच असते.
कवी सुरेश भट म्हणाले होते ..,
रंगलो रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा
गुंतलो गुंत्यात साऱ्या
पाय माझा मोकळा
– रणजित मेश्राम