– जिल्हा प्रशासनसोबत महानगरपालिका प्रशासनाचे कर्मचारीही कार्यरत
-उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सर्वेक्षणाला आली गती
नागपूर :- कालच्या नाग नदीच्या पुरामुळे शहरातील ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. त्या घरांचे पंचनामे करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज सकाळी या संदर्भात जिल्हा व महानगर प्रशासनाची बैठक झाली. मनुष्यबळ वाढवून दुपारी प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली.
नागपुरात शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.जवळपास चार तासात 109 मिलिमीटर एव्हढा पाऊस अंबाझरी तलाव्याच्या अधिग्रहणक्षेत्रात झाला. त्यामुळे नाग नदीला पूर आल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. काल यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.
मनुष्यबळ वाढविले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पंचनाम्याची गती अधिक राहावी यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे.महानगरपालिकेचे 60 कर संग्राहक ,15 महसूल निरीक्षक, 10 सहाय्यक अधीक्षक यांची टीम जिल्हा प्रशासनाच्या दिमतीला आली. नागपूर महानगरपालिका क्षत्रात असणाऱ्या तहसील कार्यालयाकडे उपलब्ध असणाऱ्या 16 तलाठ्यांच्या मदतीला ग्रामीण भागातील आणखी 28 तलाठ्यांची मदत घेण्यात आली आहे. रविवार असला तरी प्रशासन आपल्या पूर्ण गतीने या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामी लागले असून दुपारी प्रत्यक्ष पंचनाम्याची सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार व महसूल विभागाचे तलाठी, महानगरपालिका प्रशासनाचे कर संग्राहक, महसूल निरीक्षक, सहाय्यक अधीक्षक उपस्थित होते.