– समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर :- चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्याचा कार्यक्रम महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दीपक गवई, माजी आमदार परिणय फुके, अशोक थोटे, राजेंद्र चौधरी, रोशन माहुरकर, परिणीता फुके आदी मंचावर उपस्थित होते.
चर्मकार समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे विशेष म्हणजे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. महिलाशक्ती ओळखूनच देशाच्या प्रगतीसाठीच महिलांना संधी देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण लागू केल्याचे त्यांनी सांगितले.
चर्मकार महामंडळाच्या कर्ज वितरणात सुलभता आणण्यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक घेवून जामीन देण्याबाबतच्या व इतर अटी-शर्थी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बारा बलुतेदार मधील चर्मकार समाजाला उद्योग-व्यवसायात नवीन तंत्र, व्यवसायाच्या नवीन संधी, बाजारपेठ आणि कर्जही मिळाले पाहिजे, याकरता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. समाजात नवीन उद्योजक घडविण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या नवीन दालनाचा चर्मकार समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. चर्मकार समाजाकरिता नागपूर येथे समाज भवन निर्माण करण्यासाठी निधीची उपलब्धता करू असेही ते म्हणाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावीचे 230 व बारावीचे 135 असे एकूण 365 विद्यार्थ्यांचा चर्मकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात येत असल्याची माहिती प्रास्ताविकेत भैय्यासाहेब बिघाणे यांनी दिली.
कार्यक्रमाला चर्मकार संघाचे पदाधिकारी, समाजातील मान्यवर तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.