नागपूर जिल्ह्यासाठी आऊटर रिंग रोड ‘लाईफलाईन’ ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, गुंतवणूक वाढेल*

*आऊटर रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण*

नागपूर :- नागपूरचा वाढता व्याप पाहता नवीन रिंग रोड लाईफलाईन ठरणार आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला या मार्गामुळे चालना मिळेल. येत्या काळात या रिंग रोडमुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्था १ लाख कोटींची होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 856.74 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 33.50 किलोमीटरच्या आऊटर रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज डिजिटल पद्धतीने करण्यात आले. आर. आर. आर. लॉन, हिंगणा रोड येथे या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (जामठा) पासून हा मार्ग सुरू होऊन फेटरी (काटोल रोड) पर्यंत असेल. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.

लोकार्पण प्रसंगी खासदार कृपाल तुमाने, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, परिणय फुके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

नागपूर शहर हे महाराष्ट्रातील व्यापार आणि वाणिज्याचे प्रमुख केंद्र आहे. नागपूर शहराचे भारताच्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. शहरातील बाह्यवळण मार्ग प्रकल्पाचा उद्देश नागपुरातील मालवाहतूक आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करणे हा आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा फायदा होईल. शहरामधील जड वाहतुकीची गर्दी कमी होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, गुंतवणूक वाढेल असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील सर्व महत्त्वाची देवस्थाने शक्तीपीठाच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. नागपूर ते गोवा असा हा शक्तीपीठाचा मार्ग असेल. लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते, पाणी, दळणवळणाची साधने आणि वीज या चार बाबी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे विकासाला गती मिळते, गुंतवणूक वाढते, उद्योग येतात आणि रोजगार निर्माण होऊन गरिबी दूर होण्यास मदत होते. हिंगणा आणि बुटीबोरीमध्ये एमआयडीसी आल्यानंतर या भागाचा विकास झाला. हिंगण्याला स्मार्ट सिटी अशी ओळख मिळवून द्यायची आहे. नवीन रिंगरोडमुळे विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे. एअरपोर्ट स्टेशनपासून रिंगरोडच्या सुरुवातीपर्यंत आणि पुढे बुटीबोरीपर्यंतचा रस्ता हा सहापदरी होणार आहे. तसेच वाडीपासून कोंढाळीपर्यंत देखील सहापदरी रस्त्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली.

रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे, हिंगणा येथील आमदार समीर मेघे यांनी आऊटर रिंग रोडचे लोकार्पण झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक) अनिल कुमार शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार डॉ. अरविंद काळे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

Mon Feb 5 , 2024
नागपूर :- विदर्भातील झाडे कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वसतीगृह, ई-लायब्ररी व अभ्यासिका भवन अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुरातील झाडे कुणबी समाजाच्या वतीने झाडे कुणबी समाज भूखंड, पिपळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे, झाडे कुणबी समाज नागपूरचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com