नागपूर :- वित्तीय साक्षरता आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी कर जागृती सायकल रॅलीचे आयोजन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी एनएडीटीव्दारे नागपूरमध्ये करण्यात आले. या कर जागरूकता सायकल रॅलीच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये आयकर बद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. ही रॅली 11 किमीचा मार्ग पार करत नॅशनल अकादमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस नागपूर, जरीपटका गेट येथून सुरू झाली आणि फुटाळा तलाव येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीचे नेतृत्वही सायकलचा वापर पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी वाहतुकीसाठी करणारे सायकलपटु नीरज कुमार प्रजापती यांनी केले. एनएडीटीचे प्रधान महासंचालक जयंत दीदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.ही कर जागृती सायकल रॅली ‘एनएडीटीच्या वार्षिक क्रीडा संमेलन – ‘INTAX-2023’ चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये भारतीय महसूल सेवेच्या 76 व्या बॅचचे सेवापूर्व प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी अधिकारी, अकादमीतील शिक्षक यांनी सायकल चालवून करजागृती विषयी संदेशाचा प्रसार करण्यात सक्रीय सहभाग घेतला. ‘INTAX-2023’ मध्ये सहभागी होऊन, हे अधिकारी केवळ करविषयक ज्ञानच मिळवणार नाहीत तर सक्रिय आणि संतुलित जीवनाच लाभही प्राप्त करणार आहेत.