नागपूर :- शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना ऊर्जा बचतीची जाणीव व्हावी यासाठी ऊर्जा दक्षता ब्युरो व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यातर्फे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या दोन उत्कृष्ट चित्रांसह www.beestudentsaward.in या संकेतस्थळावर 31 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘देशभक्तीचे दीप लावूया, राष्ट्रासाठी ऊर्जा वाचवूया’ व ‘ऊर्जा बचतीचा नियम पाळूया, स्वप्नांचे जग विकसित करूया’ यापैकी एका विषयावर तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘या आपले भविष्य घडवूया, इलेक्ट्रिक वाहनांनी बदल घडवूया’ व ‘सगळे कर्तव्य पाळूया, देशासाठी ऊर्जा वाचवूया’ यापैकी एका विषयावर चित्र सादर करावे.
स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर 1 लाख, 50 हजार व 30 हजार रुपये अशी पहिली तीन व प्रत्येकी 15 हजारांची 10 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर 50 हजार, 30 हजार व 20 हजार रुपये अशी पहिली तीन प्रत्येकी 7 हजार 500 रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 50 उत्कृष्ट चित्रांची निवड करून स्पर्धकांना 14 नोव्हेंबर रोजी स्पर्धास्थळी चित्र काढण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सहभागी सर्वांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक वैभवकुमार पाथोडे यांनी केले आहे.