गत ५२ दिवसांपासून महाराष्ट्रात काही विरोधी पक्षीय तर काही सत्ताधारी पक्षीयांकडून एकच मागणी केली जाते आहे. ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा. त्यासाठी सुरेश धस, संदीप क्षीरसागर, सुरेश सोळंके, नमिता मुंदडा, मनोज जरांगे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि आता अंजली दमानिया हे सर्वच आकाश पाताळ एक करीत आहेत. मात्र प्रस्तुत लेख लिहिला जाईपर्यंत तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाही. तरीही या सर्वांचेच दंड थोपटणे काही थांबत नाही असे चित्र दिसते आहे.
याला कारण झाली आहे ती ९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून केलेली हत्या. ही हत्या झाल्यावर संतोषच्या कुटुंबीयांना न्याय द्यायचा म्हणून सर्वजण मैदानात उतरले. मात्र संतोषच्या कुटुंबीयांना न्याय देण्यापेक्षा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठीच हे सर्व लोक भिडलेले दिसत आहेत. हे बघता मुंडेंचे राजकीय वस्त्रहरण करण्यासाठी या सर्व मंडळींना एक संधी मिळाले हवी होती, ती संतोष देशमुख च्या हत्येमुळे मिळाली आणि मिळालेल्या संधीचा हे सर्व राजकारणी फायदा करून घेत आहेत असेच चित्र आज दिसते आहे.
झाले असे की ८ डिसेंबर २०२४ रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही इसमांनी अपहरण केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबरला संतोष देशमुखचा मृतदेहच मिळाला. संतोष देशमुख ची हत्या ही बीड जिल्ह्यातला राजकारणी वाल्मीक कराड याने घडवून आणली असा तिथल्या ग्रामस्थांचा आणि जिल्ह्यातील राजकारण्यांचा आरोप आहे. त्यासाठी कारणेही तशीच आहेत. झाले असे की वाल्मीक कराड हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस म्हणून ओळखला जातो. राजकीय वरदहस्त असल्यामुळे वाल्मीक कराडचा खंडणी गोळा करणे हाच उद्योग आहे असे बोलले जाते. परळी येथील जलविद्युत केंद्र येथे जमा होणारी राख वाहून येणाऱ्या ट्रक्स कडून नियमित खंडणी घेणे हा वाल्मीक कराडचा उद्योग असल्याचे सांगण्यात येते. त्याशिवाय जिल्ह्यात कोणताही नवीन उद्योग येणार असला की त्या उद्योगाकडून खंडणी घेणे हा देखील वाल्मीकचा उद्योग आहे असे बोलले जाते.
मसाजोग या गावाजवळ आवदा नावाच्या एका मोठ्या कंपनीने पवनचक्की उभारण्याचे काम सुरू केले होते. अशा पवनचक्क्या उभारल्या गेल्यामुळे त्या भागातील विजेचा प्रश्न सुटेल आणि नवे उद्योग येतील. परिणामी आपल्या गावातील तरुणांना रोजगार मिळेल म्हणून संतोष देशमुखचा या पवानाचक्की मालकांना पाठिंबा होता. मात्र वाल्मीक कराडचा माणूस तिथे खंडणी वसूल करण्यासाठी गेला.त्याने २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यातील ५० लाख रुपये तो वसूल करून घेऊन गेला. कंपनीचे मॅनेजर शिंदे यांनी तशी पोलीस तक्रारही केली असल्याची माहिती मिळाली. उर्वरित रक्कम मिळाली नसल्यामुळे वाल्मीकच्या माणसांनी शिंदेंना जाऊन धाक दपटशा केल्याचेही सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे आपल्या गावातील तरुणांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे याला विरोध करू नका असे सांगण्यासाठी संतोष गेला होता. त्याचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे आणि आपल्याला खांडणी घेण्यासाठी तो विरोध करतो आहे असे समजून वाल्मीकने त्याचा काटा काढायचा ठरवले आणि ८ डिसेंबर २०२४ रोजी त्याचे अपहरण होऊन दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच गावातल्या लोकांना मिळाला.
या घटनेमुळे जिल्ह्यातील जनमत क्षुब्ध झाले. जनसामान्यांचा हा दावा होता की ही हत्या वाल्मिकनेच घडवून आणली. पोलिसांनी त्या दृष्टीने तपासही सुरू केला. अर्थात हत्या होऊन ८ दिवस झाले तरी आरोपी पकडले गेले नव्हते.
त्यामुळे १६ डिसेंबर पासून विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षांनी या प्रकरणात आवाज उठवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आरोपींना तात्काळ पकडून त्यांना लवकरात लवकर शिक्षा कशी होईल हे बघितले जाईल असे आश्वासन दिले. मात्र तेव्हापासूनच भाजपाचे सुरेश धस राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर या मंडळींनी एकुणच या सर्व कटकारस्थानामागे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात आहे असा आरोप करीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
या प्रकारात विरोधकांना एक आयतेच कोलीत हातात मिळाले होते. अधिवेशन चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाऊन संतोष देशमुखच्या कुटुंबीयांना भेटून आले. पाठोपाठ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही तिथे पोहोचले. अधिवेशन संपताच संतोषच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, त्यांना मोका लावा आणि त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्या अशी मागणी करणारा एक मोर्चा बीडमध्ये निघाला. हळूहळू सर्वत्रच असे मोर्चे निघू लागले. सर्वच मोर्चांच्या मध्ये सुरेश धस, संदीप क्षीरसागर, सुरेश सोळंके, नमिता मुंदडा, बजरंग सोनवणे हे स्थानिक नेते तर राहत होतेच. त्याशिवाय मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे स्वयंघोषित नेते,राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड( शरद पवार) हे देखील आवर्जून उपस्थित राहत होते. याशिवाय विरोधी पक्षाचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे देखील प्रकरण भडकते कसे राहील हे वारंवार बोलून बघत होते.
या प्रकारात सुमारे १५ दिवसात संतोषचे मारेकरी पोलिसांना गवसले. त्यांची चौकशी सुरू झाली. मात्र वाल्मीक कराडला अद्याप पोलीस पकडू शकले नव्हते. दरम्यान वाल्मीक कराडनेच खुनाचा कट केला आहे असा कोणताही थेट पुरावा त्यांच्याजवळ नव्हता. मात्र विरोधक प्रत्येक मोर्चातून मागणी करत होते की वाल्मीक कराडला पकडा. त्याला मोका लावा.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे पकडलेल्या आरोपींना मोका लावण्यात आला होता. हे प्रकरण केजच्या स्थानिक पोलिसांकडून काढून सीआयडीकडेही सोपवण्यात आले होते. मात्र या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक होत नव्हती. शेवटी पोलिसांनी खंडणीच्या आरोपात त्याला अटक करायचे ठरवून त्याचा शोध सुरू केला. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. शेवटी दीर्घकाळानंतर तो सीआयडी ला पुण्यात शरण आला. त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. तेव्हा त्याच्यावरही मोका लावावा म्हणून विरोधकांनी आग्रह धरला. त्याचवेळी मंत्री धनंजय मुंडे यांचाही या प्रकरणात हात आहे असा दावा करत त्यांचा राजीनामा घ्यावा असा आग्रह विरोधकांकडून वारंवार धरला गेला.
या प्रकरणातील घटनाक्रम बघता इथे संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांना लवकरात लवकर कठोरातील कठोर शासन कसे होईल ही मागणी करण्यापेक्षा विरोधक आधी वाल्मीक कराड याची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा यासाठीच आक्रस्तळा आग्रह करत होते असे दिसून येत होते. वाल्मीक कराडने या हत्त्येचा कट रचला होता असा कोणताही थेट पुरावा पोलिसांना किंवा सीआयडीला त्या वेळेपर्यंत मिळालेला नव्हता. अजूनही तो मिळाला असावा असे वाटत नाही. त्याचबरोबर वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यक्तिगत संबंध आहेत, वाल्मीक हा मुंडेंचाच कार्यकर्ता आहे, मात्र त्यामुळे मुंडेंचाही या हत्त्येशी संबंध आहे किंवा मुंडे तपासा दरम्यान पोलिसांवर दबाव आणत आहेत असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. असे असले तरी विरोधक तोच आग्रह धरत होते. त्यामुळे वातावरण जास्त चिघळत चालले होते.
याबाबतीत काही निष्कर्ष काढायचा तर आधी बीड जिल्ह्यातील राजकारण समजून घेणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात एका काळात भाजपचे गोपीनाथ मुंडे यांचा दबदबा होता. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे पुतणे, त्यांचे बोट धरूनच धनंजय राजकारणात आले. मात्र ज्यावेळी गोपीनाथ मुंडे आपली मुलगी पंकजा हिला पुढे आणत आहेत असे दिसले, त्यावेळी धनंजय भाजप सोडून शरद पवारांच्या पदराखाली गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन ते विधान परिषद सदस्य बनले. तिथेही ते अजितदादा पवारांचे निष्ठावंत होते आणि आजही आहेत. गोपीनाथ मुंडे राजकारणात एक पजनदार व्यक्तिमत्व असताना सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांचे बिलकुल पटत नव्हते. गोपीनाथ मुंडेंनी आपले सरकारमधले वजन वापरून सुरेश धस यांचे बरेच नुकसान केले असा सुरेश धस यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची मुंडे परिवाराशी आधीचीच खुन्नस होती. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर सुरेश धस हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले. त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे उघड वैर होते. ते आजही चालूच आहे. संदीप क्षीरसागर यांचे काका जयदीपअण्णा क्षीरसागर यांचेही गोपीनाथजींचे सख्य नव्हते. त्यामुळे तेही धनंजय मुंडे यांचे विरोधकच आहेत. सुरेश सोळंके हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, तरीही ते धनंजय मुंडे यांचेकडे स्पर्धक म्हणून बघत असल्यामुळे तेही संधीच्या शोधात होतेच. संतोष देशमुखचे प्रकरण समोर येताच हे सर्व पापग्रह एकत्र आले आणि संतोष देशमुख च्या आडून त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि राजकीय वाटचाल रोखण्याची तयारी केली.
जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले शरद पवारांचे निकटवर्ती. ते अजित दादा पवारांकडे स्पर्धक म्हणूनच बघत होते. अजित पवार शरद पवारांची साथ सोडून भाजपासोबत गेले, तेव्हापासून ते सातत्याने अजित पवारांवर वार करण्याची संधी शोधत होते. धनंजय मुंडे यांच्या आडून त्यांना ती संधी मिळाली आणि तेही या आंदोलनात उतरले. त्यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे देखील आल्या.
सध्या सुप्रिया सुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी ठाम आहेत. अजित पवारांनी जाहीर केले आहे की धनंजय मुंडे यांचा या हत्या प्रकरणात संबंध आहे असे पुरावे मिळाल्यास मी त्यांना राजीनामा मागेन. नुसत्या आरोपावरून मी राजीनामा मागणार नाही. मात्र सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा. इथे सुप्रिया एक विसरतात की ज्यावेळी १९९४ च्या हिवाळी अधिवेशनात ११४ गोवारींचे प्राण गेले होते, त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या त्यांच्या तीर्थरूपांनी म्हणजेच शरद पवारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला नव्हता. त्यावेळी देखील विरोधकांनी ही मागणी केली होती. शेवटी जनतेने त्यांना पायउतार केले हा भाग वेगळा. अशावेळी धनंजय मुंडेंना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागण्याचा सुप्रिया सुळे यांना अधिकार आहे का याचा विचारही त्यांनी करायला हवा.
या आंदोलनाचा तवा तापलेला असताना मग सध्या राज्यातला मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षही कसा मागे राहणार? नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे देखील मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मनोज जरांगे यांना मराठा विरुद्ध वंजारा हा वाद पेटवण्याची आयती संधी मिळाली आहे. त्यामुळे तेही या आंदोलनात सक्रिय झाले आहेत. भरीस भर स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यादेखील मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी धनंजय मुंडेविरोधात अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना काही पुरावे दिल्याचीही माहिती आहे. जर अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या सर्व प्रकारात देशमुख परिवाराला न्याय देण्याची मागणी आता कोणी फारसे करताना दिसत नाही. नाही म्हणायला धनंजय मुंडे मात्र आजच पत्रकारांशी बोलताना या प्रकरणात खऱे आरोपी शोधावे आणि त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी आपली मागणी आहे असे माध्यमांशी बोलताना म्हणाले. मात्र ही इतर मंडळी कोणीही संतोष देशमुखचा उल्लेख करत नाहीत. ते फक्त धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. सुरेश धस हे दररोज धनंजय मुंडे यांच्या नव्या नव्या कथित भानगडी पुढे आणत आहेत. धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री करू नये यासाठी त्यांनी आकाश पाताळ एक केले. शेवटी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतले. आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा हेच या सर्व विरोधकांचे लक्ष्य आहे असे चित्र दिसते आहे. त्यासाठीच त्यांची आदळआपट सुरू आहे. यातून संतोष देशमुख च्या अडून आपले राजकीय हिशेब चुकते करायचे हेच या सर्व मंडळींचे लक्ष्य आहे हे स्पष्ट दिसते आहे.
एकूणच या सर्व मंडळींना आपले हिशोब चुकते करण्यासाठी संधी हवी होती. ती संधी मिळताच ते तुटून पडले आहेत आणि आपले साध्य साधण्यासाठी धडपडत आहेत. सध्या तरी अजित पवारांनी जोवर नेमके पुरावे मिळत नाहीत तोवर मी मुंडेंना राजीनामा मागणार नाही असे सांगितले आहेआणि अजितदादा सांगत नाहीत तोवर मी मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या मंडळींची गोची झालेली दिसते आहे. एकूणच संतोष देशमुखच्या कुटुंबीयांना न्याय मिळो न मिळो, आपले लक्ष्य साधायचेच असे या मंडळींचे प्रयत्न चालू असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
वाचकहो.. पटतेय का तुम्हाला हे…? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो..!
– अविनाश पाठक