मुंबई :- आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येत असून यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलून नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
देशातील पेट्रोल, दूध, डाळी व इतर धान्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. गेल्या सहा महिन्यांमध्ये दूधाच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली असून जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. परंतु तरीदेखील त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना अद्याप मिळालेला नाही. देशातील आयात-निर्यातीचे गुणोत्तर पुर्णतः कोसळले आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या उत्पादनांमध्ये घट झाली आहे. याखेरीज चलनवाढीचा दर साडेसहापेक्षा जास्त (६.५२) इतका झाला आहे याकडेही खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले आहे.
या अतिशय गंभीर बाबी असून आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना यावरुन येऊ शकते असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.